यूरो कप २०२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निर्णायक पेनल्टी शूटआउटमध्ये इंग्लंडचा पराभव झाला. यात इंग्लंडच्या मार्क्स रॅशफोर्ड, जॅडॉन सँचो आणि बुकायो साका यांनी पाच पैकी ३ पेनल्टी मिस केल्या. यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांनी तिन्ही खेळाडूंवर वर्णभेदी टीका सुरु केली आहे. यानंतर इंग्लंड फुटबॉल असोसिएशननं यावर नाराजी व्यक्त केली आहे. वर्णभेदी टीका केल्याप्रकरणी जे लोक दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी खेळाडूंवर वर्णभेदी टीका केल्याचा निषेध केला आहे. “इंग्लंडच्या टीमला हिरो संबोधलं पाहीजे. वर्णभेदी टीका चुकीची आहे आणि लोकं असं करत आहेत. त्यांना लाज वाटली पाहीजे”, असं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी सांगितलं आहे.

सोशल मीडियावर या तिघांच्या फोटोवर माकडांचे इमोजी वापरले जात आहे. त्याचबरोबर अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्यात येत आहे. इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू रहीम स्टर्लिंगवरही टीका करण्यात आली आहे. याप्रकरणी कंजरवेटिव पक्षाचे खासदार टॉम टुगेनधत यांनी सोशल मीडिया कंपन्यांना यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे. इंग्लंड फुटबॉल असोसिएशननं प्रसिद्ध पत्रक जाहीर करत वर्णभेदी टीकेचा निषेध केला आहे. याप्रकरणी लंडन मेट्रोपोलिटन पोलीस तपास करत आहे.

इंग्लंडचा प्रशिक्षक साउथगेटनं पेनल्टी मिसची जबाबदारी घेतली आहे. “मी खेळाडूंची नियुक्ती केली होती. शेवटच्या क्षणात मी हा निर्णय घेतला. यावर आम्ही प्रशिक्षण केंद्रात काम केलं होतं. हा एक प्रकारचा जुगार होता. मात्र हा पराभव सांघिक आहे. यासाठी कोणताही खेळाडू जबाबदार नाही”, असं इंग्लंडचा प्रशिक्षक साउथगेट याने सांगितलं.

“…म्हणून Euro Cup स्पर्धेत इंग्लंडचाच विजय”; न्यूझीलंड क्रिकेटपटूंचा टोमणा

पेनल्टी शूटआउटचा थरार

पेनल्टी शूटआउटमध्ये इटलीच्या डॉमेनिको बेरार्डीने पहिला गोल मारला. त्यानंतर इंग्लंडच्या हॅरी केननं गोल झळकावत बरोबरी साधली. त्यानंतर इटलीच्या अँड्रिया बेलोट्टीचा गोल मिस झाला आणि इटलीवर दडपण वाढलं. त्यानंतर इंग्लंडच्या हॅरी मग्युरेने गोल झळकावत २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर इटलीच्या लेओनार्डोने गोल मारत २-२ बरोबरी केली. मात्र दुसरा गोल हुकल्याने इटलीवरील दडपण कायम होतं. त्यानंतर इंग्लंडच्या मार्कस रॅशफोर्डचा गोल हुकला आणि इटलीच्या जीवात जीव आला. फेडेरिकोने गोल मारत इटलीला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर आलेला जॅडॉन सँचोही इंग्लडला बरोबरी साधून देण्यास अपयशी ठरला. त्यानंतर इटलीच्या जॉर्जिओने विजयी गोल मारण्यास अपयशी ठरला. त्यामुळे पाच गोलचा पेनल्टी शूट बरोबरी सुटेल अशी आशा होती. मात्र इंग्लंडचे खेळाडू सलग तीन गोल मारण्यात अपयशी ठरले. इंग्लंडच्या बुकायो साकाही गोल करण्यात अपयशी ठरला आणि इटलीने पेनल्टी शूटआउटमध्ये सामना ३-२ ने जिंकला.