संपूर्ण जगावर करोनाचं सावट असल्याने २०२० साली होणारा यूईएफए यूरो कप स्थगित करण्यात आला होता. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात असल्याने यंदा या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. महिनाभर चालणाऱ्या स्पर्धेत एकूण २४ संघ सहभागी होणार असून ५१ सामने खेळळे जाणार आहेत. मात्र स्पर्धेची पूर्ण तयारी झाली असताना स्पेन आणि स्वीडनच्या प्रत्येकी दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे फुटबॉलपटू आणि चाहत्यांना पुन्हा धाकधूक लागून आहे. यानंतर संघ प्रशासनानं स्पेनच्या सर्व खेळाडूंचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पेनचे आरोग्यमंत्री कॅरोलिना डारियस यांनी ही माहिती दिली आहे. स्पेन संघातील सरजिओ बसक्वेट आणि डिआगो लोरन्टे या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर स्वीडनच्या देजा कुलुसेवस्की आणि मॅथिस स्वानबर्ग या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानं त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

स्पेन संघाचा कर्णधार बसक्वेट याला करोनाची लागण झाल्यानंतर संपूर्ण संघ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आला होता. तसेच त्यांना वैयक्तिकरित्या प्रशिक्षण दिलं जात होतं. त्यानंतर गुरुवारी डिफेंडर डिआगो लोरन्टे याला करोनाची लागण झाली. त्यामुळे या दोघांना स्वीडनविरुद्धच्या पहिल्या सामन्याला मुकावं लागणार आहे. तर पोलंडविरुद्धच्या सामन्यात दोघंही खेळतील असं संघाकडून जाहीर करण्यात आलं आहे. या दोन खेळाडूं व्यतिरिक्त कोणताही खेळाडूला करोनाची लागण झाली नसल्याचं समोर आलं आहे.

स्पेनचा पहिला सामना स्वीडनसोबत १५ जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री साडे बारा वाजता असणार आहे. स्पेनच्या ग्रुपमध्ये पोलंड, स्लोवाकिया, स्वीडन या देशांचा समावेश आहे. मात्र असं असलं तरी स्पेन संघ व्यवस्थापनाने एक राखीव संघ तयार केला आहे. करोनाची लागण इतर खेळाडूंना झाली तर दुसरा संघ खेळवण्याची तयारी स्पेननं केली आहे.

फुटबॉलसमोर क्रिकेट ‘फेल’, IPLपेक्षा ११ हजार कोटींनी नफा कमावणाऱ्या स्पर्धेला होतेय सुरुवात!

लष्कराकडून स्पेनच्या खेळाडूंचा लसीकरण करण्यात येणार आहे, असं डॅरियस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. ऐन स्पर्धेपूर्वी सर्व खेळाडूंचं लसीकरण होणार असल्याने खेळाडू निश्चिंत आहेत. या निर्णयामुळे टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या खेळाडूंना फायदा होणार आहे. त्यांच्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.