यूरो कप २०२० स्पर्धेतील साखळी सामन्यात प्रत्येक संघाचा एक एक सामना पार पडल्यानंतर आता बाद फेरीत पोहोचण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. आज फिनलँड विरुद्ध रशिया, टर्की विरुद्ध वेल्स आणि इटली विरुद्ध स्वित्झर्लंड यांच्यात सामना रंगणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक संघाची बाद फेरीत पोहोचण्यासाठीची धडपड असणार आहे. स्पर्धेतील अस्तित्व आजच्या सामन्यांवर अवलंबून असणार आहे.

फिनलँड विरुद्ध रशिया
यूरो कप २०२० चषकातील साखळी सामन्यातील ‘ब’ गटात आज फिनलँड विरुद्ध रशिया हे दोन संघ आमनेसामने असणार आहेत. फिनलँडनं डेन्मार्कवर १-० ने विजय मिळवत गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावलं आहे. त्यामुळे बाद फेरीत पोहोचण्यासाठी आता रशियाला पराभूत करणं गरजेचं आहे. रशियाला पराभूत करण्यास फिनलँडला यश आलं तर बाद फेरीतील आव्हान कायम राहणार आहे. तर दुसरीकडे रशियाचं स्पर्धेतील अस्तित्व आजच्या सामन्यावर अवलंबून असणार आहे. पहिल्या सामन्यात बेल्जियमने रशियाला ३-० ने पराभूत केलं होतं. या पराभवामुळे ‘ब’ गटातील गुणतालिकेत रशिया चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी रशियाला आजचा आणि डेनमार्क विरुद्धचा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात रशियाला चांगलाच घाम गाळावा लागणार आहे.

वेल्स विरुद्ध टर्की

आज ‘अ’ गटात दोन सामने आहेत. वेल्स विरुद्ध टर्की आणि इटली विरुद्ध स्वित्झर्लंड यांच्यात सामना रंगणार आहे. त्यामुळे या दोन सामन्यातून बाद फेरीतील चित्र जवळपास आजच स्पष्ट होईल. वेल्स आणि स्वित्झर्लंडमध्ये झालेला सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात वेल्सला आपलं बाद फेरीतील आव्हान कायम ठेवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. तर टर्कीला यापूर्वी इटलीकडून पराभव सहन करावा लागला आहे. इटलीने टर्कीला ३-० ने पराभूत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात तुर्कीची करो या मरोची स्थिती आहे.

इटली विरुद्ध स्वित्झर्लंड

यूरो कप २०२० स्पर्धेतील ‘अ’ गटातील दुसरा साखळी सामना इटली विरुद्ध स्वित्झर्लंड संघात रंगणार आहे. या सामन्यानंतर बाद फेरीतील चित्र जवळपास स्पष्ट होणार आहे. इटलीने तुर्कीला ३-० ने पराभूत केल्याने त्यांच्या खात्यात ३ गुण जमा झाले आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकत बाद फेरीत पोहोचण्याची इटली संघाची धडपड असणार आहे. तर स्वित्झर्लंडचा पहिला सामना बरोबरीत सुटल्याने त्यांच्यावर हा सामना जिंकत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्याचं आव्हान असणार आहे.

यूरो कप २०२० स्पर्धेत तीन लढती

  • सामना- फिनलँड Vs रशिया
    वेळ- भारतीय वेळेनुसार संध्या. ६.३० वाजता
  • सामना- टर्की Vs वेल्स
    वेळ- भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० वाजता
  • सामना- इटली Vs स्वित्झर्लंड
    वेळ- भारतीय वेळेनुसार रात्री १२.३० वाजता