यूरो कप चषक 2020 स्पर्धेतील डेन्मार्क विरुद्ध बेल्जियम सामन्यात जलद गोल झाल्यानंतर बेल्जियमवर दडपण आलं होतं. मात्र हे दडपण दूर सारत बेल्जियमने दुसऱ्या सत्रात कमबॅक केलं. दुसऱ्या सत्रात दोन गोल झळकावत सामन्यावर मजबूत पकड मिळवली. या विजयासह बेल्जियमचं बाद फेरीतील स्थान निश्चित झालं आहे. यापूर्वीच्या सामन्यात बेल्जियमने रशियाला ३-० ने मात दिली होती. त्यामुळे आता दोन सलग विजयांसह बेल्जियम संघाचं स्थान बाद फेरीत निश्चित झालं आहे. तर डेन्मार्कचं बाद फेरीत जाण्याचं स्वप्न भंगलं आहे. या सामन्यातील हा डेन्मार्कचा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी फिनलँडने डेन्मार्कला १-० ने मात दिली होती.

दुसऱ्या सत्रातील सामना सुरु झाल्यानंतर बेल्जियमने आक्रमक खेळी केली. सामन्याच्या ५४ व्या मिनिटाला थोरगन हझार्ड याने गोल झळकावत सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतरही बेल्जियमने आक्रमक पवित्रा कायम ठेवला. सामन्याच्य ७० व्या मिनिटाला केविन ब्रुयनेनं एक गोल मारत संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे पहिल्या सत्रात असलेलं सर्व दडपण डेन्मार्क संघावर गेलं. सामन्यात बरोबरी साधण्यासाठी शेवटपर्यंत त्यांची दमछाक झाली. या विजयासह बेल्जियमचा संघ बाद फेरीत पोहोचला आहे.

यूरो कप २०२० स्पर्धेत डेन्मार्क विरुद्ध बेल्जियम स्पर्धेत दुसऱ्या मिनिटाला गोलची नोंद झाली. युरो चषक इतिहासातील हा दुसरा जलद मारलेला गोल आहे. डेन्मार्कच्या युसूफ पॉलसेननं गोल झळकवला आणि डेन्मार्कला १ गोलची आघाडी मिळवून दिली. यामुळे बेल्जियमवर दडपण वाढलं होतं. पहिल्या सत्राचा खेळ संपला तेव्हा डेन्मार्ककडे १ गोलची आघाडी होती. मात्र दुसऱ्या सत्रात बेल्जियमनं जबरदस्त कमबॅक केलं.

या सामन्यात ख्रिश्चियन एरिक्सनसाठी फुटबॉलप्रेमींकडून प्रार्थना करण्यात आली. यावेळी खेळ काही क्षण थांबवण्यात आला. यावेळी ख्रिश्चियन एरिक्सनचा आठवण काढण्यात आली. सध्या एरिक्सनवर रुग्णालयात उपचार सुरु असून तो लवकरच बरा होईल असं सांगण्यात आलं आहे. यावेळी उपस्थित फुटबॉलप्रेमींनी “आमचं तुझ्यावर प्रेम आहे ख्रिश्चियन”, असा फलक मैदानात झळकवला.

यूरो कप २०२० स्पर्धेत ‘ब’ गटातील साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात बेल्जियमने रशियाला ३-० ने पराभूत केलं होतं. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला होता. तर डेन्मार्कला यापूर्वीच्या सामन्यात फिनलँडकडून १-० ने पराभव सहन करावा लागला होता. या सामन्यात एरिक्सन मैदानात कोसळल्याने डेन्मार्कच्या गोटात चिंतेचं वातावरण होतं. मात्र तो व्यवस्थित असल्याचं कळल्यानंतर सामना पुन्हा सुरु करण्यात आला. तेव्हा फिनलँडने आक्रमक खेळी करत १ गोलची आघाडी घेतली आणि विजय मिळवला.

डेन्मार्क आणि बेल्जियम मोठ्या फुटबॉल स्पर्धेतील साखळी सामन्यात एकदाच आमनेसामने आले आहेत. यूरो कप १९८४ डेन्मार्कने बेल्जियमला ३-२ ने पराभूत केलं होतं. एप्रिल १९२२ साली झालेल्या स्पर्धेतील एकमेव सामना गोलरहित झाला होता. त्यानंतर दोन्ही संघ १४ वेळा एकमेकांसमोर आले. या १४ सामन्यात ३.७ च्या सरासरीने ५२ गोल झाले आहेत.