यूरो कप चषक २०२० स्पर्धेत डेन्मार्कने जलद गोल झळकावूनही त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. बेल्जियमने डेन्मार्कचा २-१ ने पराभव केला. डेन्मार्क विरुद्ध बेल्जियम सामन्यात जलद गोल झाल्यानंतर बेल्जियमवर दडपण आलं होतं. मात्र हे दडपण दूर सारत बेल्जियमने दुसऱ्या सत्रात कमबॅक केलं. दुसऱ्या सत्रात दोन गोल झळकावत सामन्यावर मजबूत पकड मिळवली. या विजयासह बेल्जियमचं बाद फेरीतील स्थान निश्चित झालं आहे. यापूर्वीच्या सामन्यात बेल्जियमने रशियाला ३-० ने मात दिली होती. त्यामुळे आता दोन सलग विजयांसह बेल्जियम संघाचं स्थान बाद फेरीत निश्चित झालं आहे. तर डेन्मार्कचं बाद फेरीत जाण्याचं स्वप्न भंगलं आहे. या सामन्यातील हा डेन्मार्कचा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी फिनलँडने डेन्मार्कला १-० ने मात दिली होती.

दुसऱ्या सत्रातील सामना सुरु झाल्यानंतर बेल्जियमने आक्रमक खेळी केली. सामन्याच्या ५४ व्या मिनिटाला थोरगन हझार्ड याने गोल झळकावत सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतरही बेल्जियमने आक्रमक पवित्रा कायम ठेवला. सामन्याच्या ७० व्या मिनिटाला केविन ब्रुयनेनं एक गोल मारत संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे पहिल्या सत्रात असलेलं सर्व दडपण डेन्मार्क संघावर गेलं. सामन्यात बरोबरी साधण्यासाठी शेवटपर्यंत त्यांची दमछाक झाली. या विजयासह बेल्जियमचा संघ बाद फेरीत पोहोचला आहे.

यूरो कप २०२० स्पर्धेत डेन्मार्क विरुद्ध बेल्जियम स्पर्धेत दुसऱ्या मिनिटाला गोलची नोंद झाली. युरो चषक इतिहासातील हा दुसरा जलद मारलेला गोल आहे. डेन्मार्कच्या युसूफ पॉलसेननं गोल झळकवला आणि डेन्मार्कला १ गोलची आघाडी मिळवून दिली. यामुळे बेल्जियमवर दडपण वाढलं होतं. पहिल्या सत्राचा खेळ संपला तेव्हा डेन्मार्ककडे १ गोलची आघाडी होती. मात्र दुसऱ्या सत्रात बेल्जियमनं जबरदस्त कमबॅक केलं.

 

यूरो कप २०२० स्पर्धेत ‘ब’ गटातील साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात बेल्जियमने रशियाला ३-० ने पराभूत केलं होतं. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला होता. तर डेन्मार्कला यापूर्वीच्या सामन्यात फिनलँडकडून १-० ने पराभव सहन करावा लागला होता.