करोनानं संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. करोनारुपी राक्षसाच्या तावडीतून एकही देश सुटलेला नाही. त्यामुळे प्रत्येक जण काळजी घेत आहे. करोनाचा जोर ओसरत असला तरी करोना संपूर्णपणे नष्ट झालेला नाही. यासाठी लसीकरण प्रभावी हत्यार आहे. यूरो २०२० फुटबॉल चषकावरही करोनाचं सावट आहे. गेल्या वर्षी करोनामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. मात्र त्यानंतर योग्य काळजी आणि नियोजन करत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. असं असलं तरी स्पर्धेपूर्वी स्पेनच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. यानंतर स्पेननं सर्व खेळाडूंचं लसीकरण करण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार शुक्रवारी सर्व खेळाडूंचं लसीकरण करण्यात आलं.

लष्कराकडून स्पेनच्या खेळाडूंचा लसीकरण करण्यात आलं. स्पॅनिश संघाच्या प्रशिक्षण केंद्रात जाऊन त्यांना करोनावरील लस देण्यात आली. याबाबतची अधिकृत माहिती स्पॅनिश फुटबॉल संघाने ट्वीटरद्वारे दिली आहे. मागच्या महिन्यात खेळाडूंचं लसीकरण करण्याची सरकारची विनंती फेडरेशनने फेटाळून लावली होती.

स्पेन संघाचा कर्णधार बसक्वेट याला करोनाची लागण झाल्यानंतर संपूर्ण संघ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आला होता. तसेच त्यांना वैयक्तिकरित्या प्रशिक्षण दिलं जात होतं. त्यानंतर गुरुवारी डिफेंडर डिआगो लोरन्टे याला करोनाची लागण झाली. त्यामुळे या दोघांना स्वीडनविरुद्धच्या पहिल्या सामन्याला मुकावं लागणार आहे. तर पोलंडविरुद्धच्या सामन्यात दोघंही खेळतील असं संघाकडून जाहीर करण्यात आलं आहे. या दोन खेळाडूं व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला करोनाची लागण झाली नसल्याचं समोर आलं आहे.

UEFA Euro Cup 2020: करोनामुळे स्पर्धेच्या नियमात बदल

स्पेनचा पहिला सामना स्वीडनसोबत १५ जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री साडे बारा वाजता असणार आहे. स्पेनच्या ग्रुपमध्ये पोलंड, स्लोवाकिया, स्वीडन या देशांचा समावेश आहे.