बसेल/लंडन : ल्युका मॉड्रिचच्या शानदार गोलमुळे क्रोएशियाने स्कॉटलंडला ३-१ असे पराभूत करत युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. इंग्लंडनेही चेक प्रजासत्ताकवर मात करत ‘ड’ गटात अग्रस्थानासह आगेकूच केली.

निकोला व्लासिक याने १७व्या मिनिटाला क्रोएशियाला आघाडीवर आणल्यानंतर कलम मॅकग्रेगोर याने ४२व्या मिनिटाला स्कॉटलंडला बरोबरी साधून दिली. क्रोएशियाला बाद फेरीत मजल मारण्यासाठी हा सामना दोन गोलच्या फरकाने जिंकणे क्रमप्राप्त होते.

कर्णधार मॉड्रिचने ६२व्या मिनिटाला अप्रतिम गोल करत क्रोएशियाला आघाडी मिळवून दिली. युरो चषकाच्या तीन स्पर्धात (२००८, २०१६, २०२०) गोल झळकावणारा मॉड्रिच हा क्रोएशियाचा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. त्यानंतर १५ मिनिटांनी इव्हान पेरिसिक याने तिसऱ्या गोलची भर घालत क्रोएशियाला गोलफरकाच्या आधारावर बाद फेरीत पोहोचवले. ‘ड’ गटात इंग्लंडने सात गुणांसह अग्रस्थान पटकावले, तर क्रोएशियाने चार गुणांची कमाई करत दुसरे स्थान पटकावले. चेक प्रजासत्ताकला चार गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

सलामीच्या सामन्यात बरोबरी पत्करल्यानंतर इंग्लंडने चेक प्रजासत्ताकवर १-० अशी मात करत युरो चषकातील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. रहिम स्टर्लिगने १२व्या मिनिटाला हेडरवर केलेला गोल इंग्लंडच्या विजयात निर्णायक ठरला. स्टर्लिगचा हा यंदाच्या स्पर्धेतील दुसरा गोल ठरला. इंग्लंडला बाद फेरीत ‘फ’ गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी (कदाचित फ्रान्स, जर्मनी आणि पोर्तुगालपैकी एकाशी) लढत द्यावी लागणार आहे. ‘‘इंग्लंडची कामगिरी लौकिकानुसार होत नसली तरी आमचा संघ बलाढय़ आहे. चेक प्रजासत्ताक हा चांगला संघ असल्यामुळे त्यांचा बचाव भेदणे कठीण होते. आता बाद फेरीतील आव्हानांसाठी आम्ही सज्ज आहोत,’’ असे इंग्लंडचे प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांनी सांगितले.

लूक डे जाँगची दुखापतीमुळे माघार

नेदरलँड्सचा आघाडीवीर लूक डे जाँग याने गुडघ्याच्या दुखापतीमुळे युरो चषक फुटबॉल स्पर्धेतून माघार घेतली आहे. मंगळवारी सराव करत असताना डे जाँगच्या गुडघ्याला दुखापत झाली. सेव्हियाचा आघाडीवीर असलेल्या डे जाँगने ३८ सामन्यांत नेदरलँड्सचे प्रतिनिधित्व केले आहे. नेदरलँड्सने ‘क’ गटातील तिन्ही सामने जिंकत बाद फेरी गाठली आहे.

अंतिम फेरीबाबत वाटाघाटी सुरूच

वेम्बले स्टेडियमवर युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सामना आयोजित करण्यास ब्रिटन उत्सुक असल्याचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या प्रवक्त्याने सांगितले. ११ जुलै रोजी रंगणाऱ्या या महाअंतिम फेरीसाठी २५०० अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना प्रवेश देण्याबाबत सध्या युरोपियन फुटबॉल महासंघ (यूएफा) आणि इंग्लिश फुटबॉल असोसिएशन यांच्यात अद्याप तोडगा निघालेला नाही. याबाबत सध्या वाटाघाटी सुरू आहेत.

गुणतालिका गट ‘ड’

संघ                   सा     वि     प      ब      गु

इंग्लंड                ३      २      ०      १      ७

क्रोएशिया           ३      १      १      १      ४

चेक प्रजासत्ताक  ३      १      १      १      ४

स्कॉटलंड             ३      ०      २      १      १