यूरो कप स्पर्धेतील क्रोएशिया आणि चेक रिपब्लिक यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. यामुळे चेक रिपब्लिकला बाद फेरीत पोहचण्यासाठी पुढचा सामना जिंकणं गरजेचं आहे. तर क्रोएशियाचं स्पर्धेतील आव्हान अजूनही कायम आहे. मात्र हे गणित जर तर वर अवलंबून आहे. चेक रिपब्लिक पुढचा सामना हरल्यास बाद फेरीत पोहोचण्याचा आशा कायम राहतील.

पहिल्या सत्रात चेक रिपब्लिकच्या पॅट्रिक चिकने ३७ व्या मिनिटाला गोल झळकावून संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. दुसऱ्या सत्रात क्रोएशियाने बरोबरी साधत संघावरचं दडपण दूर सारलं. ४७ व्या मिनिटाला इवान परिसिक याने गोल झळकावला. त्याला क्रॅमरिक याने अचूक पास दिल्याने गोल झळकवण्यास मदत झाली. त्यानंतर शेवटच्या मिनिटापर्यंत दोन्ही संघ विजयी आघाडी घेण्यासाठी धडपडत राहीले. अखेर दोन्ही संघांना एक एक गोलवर समाधान मानावं लागलं.

सामन्यात दोन्ही संघांनी तुल्यबळ लढत दिली. दोन्ही संघांनी फुटबॉल आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. चेक रिपब्लिकने ५२ टक्के म्हणजेच ४४८ वेळा खेळाडूंना पास देत फुटबॉल आपल्या ताब्यात ठेवला. तर क्रोएशियाने ४८ टक्के म्हणजेच ४३१ वेळा खेळाडूंना पास देत फुटबॉल आपल्या ताब्यात ठेवला. चेक रिपब्लिकला टार्गेटवर गोल मारण्याची एक संधी मिळाली. तर क्रोएशियाला दोन संधी मिळाल्या. या सामन्यात मैदानातील गैरवर्तवणुकीसाठी चेक रिपब्लिकच्या ३, क्रोएशियाच्या एका खेळाडूला पिवळं कार्ड दाखवण्यात आलं.

चेक रिपब्लिक आणि क्रोएशिया हा सामना बरोबरीत सुटल्याने ‘ड’ गटातील गुणतालिकेचं गणित विस्कटलं आहे. आता चेक रिपब्लिक आणि क्रोएशिया यांचं बाद फेरीत जाण्याचं स्वप्न जर तर वर अवलंबून आहे.