यूरो कप २०२० स्पर्धेतील डेन्मार्कचा प्रवास पाहिला तर कुणालाही आश्चर्य वाटेल असाच आहे. फिनलँड विरुद्धचा सामना गमवल्यानंतर डेन्मार्क इतकं जबरदस्त कमबॅक करेल, असं वाटणं कठीण होतं. पहिल्याच सामन्यातील पहिल्या सत्राच्या शेवटी एरिक्सन मैदानात कोसळला होता. त्यानंतर खेळाडूंच्या गोटात चिंतेचं वातावरण होतं. हा सामनाही डेन्मार्कने १-० ने गमावला होता. मात्र सर्व अडचणींवर मात करत डेन्मार्कने उपांत्य फेरी गाठली आहे. साखळी फेरीतील गुण सरासरीमुळे डेन्मार्कला बाद फेरीत संधी मिळाली. डेन्मार्कच्या खेळाडूंनी या संधीचं सोनं केलं. उपांत्यपूर्व फेरीत चेक रिपब्लिक संघाचा २-१ ने धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरी गाठली. २९ वर्षानंतर डेन्मार्कने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

यूरो कप स्पर्धेत डेन्मार्कने चेक रिपब्लिक संघाला २-१ ने नमवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पहिल्या सत्रात मिळवलेल्या दोन गोलमुळे विजय सोपा झाला. चेक रिपब्लिक संघावर दडपण दुसऱ्या सत्रातही कायम राहिलं. बरोबरी साधण्यासाठी चेक रिपब्लिकचे खेळाडू झगडत राहिले. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. दुसऱ्या सत्रात चेक रिपब्लिकच्या पॅट्रिक चिकने गोल झळकावत दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र बरोबरी काही साधता आली ना्ही. या पराभवासह चेक रिपब्लिकचं यूरो चषकाचं स्वप्न भंगलं आहे. पहिल्या सत्रात डेन्मार्कने चेक रिपब्लिकवर दोन गोलची आघाडी मिळवली होती. त्यामुळे चेक रिपब्लिक संघावर दडपण कायम राहिलं. पाचव्या मिनिटाला डेन्मार्कने गोल झळकवत चेक रिपब्लिक संघावर दडपण निर्माण केलं. डेन्मार्कच्या थॉमस डेलनेनं जे लार्सननं पास केलेला बॉल थेट गोलमध्ये रुपांतरीत केला. त्यानंतर ४२ व्या मिनिटाला कॅस्पर डोलबर्ग याने गोल झळकावत संघाला दोन गोलची आघाडी मिळवून दिली. यामुळे पहिल्या सत्रात दोन गोलने पिछाडीवर पडल्याने चेक रिपब्लिक संघावर दडपण आलं. थॉमस डेलने पाचव्या मिनिटाला मारलेला गोल यूरो कप २०२० स्पर्धेतील हा दुसरा जलद गोल आहे.

या सामन्यासाठी चेक रिपब्लिकनं ४-२-३-१, तर डेन्मार्कनं ३-४-२-१ अशी व्यूहरचना आखली होती. या सामन्यात फुटबॉलवर सर्वाधिक वर्चस्व हे चेक रिपब्लिक संघाचं होतं. मात्र डेन्मार्कने आपल्या रणनितीसह दोन गोल झळकावले आणि उपांत्य फेरीत धडक मारली. या सामन्यात चेक रिपब्लिकच्या ताब्यात ५६ टक्के बॉल होता. तर डेन्मार्कच्या ताब्यात ४४ टक्के बॉल होता. चेक रिपब्लिकने ४५१ पास केले. त्याची पास अचूकता ही ८० टक्के होती. तर डेन्मार्कने ३७५ वेळा बॉस पास केला. त्यांची पास अचूकता ही ७५ टक्के इतकी होती. चेक रिपब्लिकच्या दोन खेळाडूंना मैदानात गैरवर्तन केल्याने पिवळं कार्ड दाखवण्यात आलं. यूरोपियन चॅम्पियनशिपमध्ये चेक रिपब्लिक आणि डेन्मार्क तिसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले होते. मागच्या दोन्ही सामन्यात चेक रिपब्लिकने डेन्मार्कवर विजय मिळवला आहे. यूरो कप २००० स्पर्धेतील साखळी सामन्यात, तर २००४ यूरो कप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत नमवत उपांत्य फेरी गाठली होती.

डेन्मार्कची या स्पर्धेतील सुरुवात खराब झाली, पहिल्या सामन्यात फिनलँडकडून १-० ने पराभव सहन करावा लागला. त्यानंतर बेल्जियमकडून २-१ ने हार पत्कारावी लागली. तर साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यात रशियाचा ४-१ ने पराभव करत बाद फेरीत धडक मारली. बाद फेरीत डेन्मार्कने वेल्सचा ४-० ने धुव्वा उडवला.