रोम : युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत बलाढय़ जर्मनीवर ऐतिहासिक विजयाची नोंद केल्यानंतर आता इंग्लंडसमोर सोपा पेपर असणार आहे. शनिवारी मध्यरात्री रंगणाऱ्या उपांत्यपूर्व लढतीत इंग्लंडला युक्रेनशी दोन हात करावे लागणार आहेत.

इंग्लंडने कट्टर प्रतिस्पर्धी जर्मनीला २-० असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. रहिम स्टर्लिगने आतापर्यंत तीन गोल लगावत इंग्लंडच्या विजयात मोलाचा हातभार लावला आहे. त्यांचा अव्वल आघाडीवीर हॅरी केनला जर्मनीविरुद्ध सूर गवसला. त्यामुळे आतापर्यंत एकही गोल न स्वीकारणारा इंग्लंडचा संघ १९९६नंतर प्रथमच युरो चषकाची उपांत्य फेरी गाठण्यासाठी सज्ज झाला आहे.

युक्रेनने उपउपांत्यपूर्व फेरीत स्वीडनवर अतिरिक्त वेळेत २-१ अशी सरशी साधत प्रथमच युरो चषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली. युक्रेनच्या आक्रमणाची भिस्त आंद्रिय यार्मोलेंको आणि ओलेक्झांडर झिनचेंको यांच्यावर असून ते इग्लंडमधील क्लबकडून खेळत आहेत. मात्र या सामन्यात विजय मिळवायचा असल्यास युक्रेनच्या बचावफळीला स्टर्लिग आणि हेनचे आक्रमण थोपवावे लागेल.

टोनी क्रूसची निवृत्ती

बर्लिन : जर्मनीचा मध्यरक्षक टोनी क्रूस याने राष्ट्रीय संघातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. क्रूसने १०६ सामन्यांत जर्मनीचे प्रतिनिधित्व केले आहे.

युरो चषक फुटबॉल स्पर्धेत जर्मनीला इंग्लंडकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला. करोनाच्या संसर्गातून सावरल्यानंतर क्रूसने या सामन्यात जर्मनीचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र यापुढे तो क्लब स्तरावर रेयाल माद्रिदकडून खेळणार आहे.

‘‘कुटुंबासाठी हा निर्णय घेतला आहे. पती आणि वडील या दोन्ही जबाबदाऱ्या आता चांगल्या पद्धतीने निभावण्याची गरज आहे,’’ असे क्रूसने सांगितले.