यूरो कप २०२० स्पर्धेतील ‘ड’ गटातील साखळी सामन्यात इंग्लंडने क्रोएशियाला पराभूत केलं. पहिल्या सत्रात दोन्ही संघाच्या खेळाडूंना गोल करण्यात अपयश आलं होतं. मात्र दुसऱ्या सत्रात रहिम स्टरलिंगने गोल करत इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दडपणात आलेल्या क्रोएशियाचा संघ सामन्यात बरोबरी साधण्यासाठी धडपड करताना दिसून आला. इंग्लंडने या सामन्यासाठी ४-२-३-१ अशी खेळाडूंची व्यूहरचना आखली होती. तर क्रोएशियाने ४-३-३ अशा पद्धतीने रणनिती आखली होती. या सामन्यात इंग्लंडच्या १, तर क्रोएशियाच्या ३ खेळाडूंना गैरवर्तन केल्याप्रकरणी पिवळं कार्ड दाखवण्यात आलं.

यूरो कप २०२० स्पर्धेत इंग्लंडने विजयी सलामी दिली आहे. क्रोएशियाचा १-० ने पराभव करत ‘ड’ गटातील गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. पहिल्या सत्रात दोन्हीही संघांना गोल करण्यात यश आलं नाही. मात्र इंग्लंडने दुसऱ्या सत्रात आपला आक्रमक बाणा कायम ठेवत क्रोएशियावर दडपण निर्णाण केलं. अखेर मॅचच्या ५७ व्या मिनिटाला रहिम स्टरलिंगने गोल केला आणि विजयाचा मार्ग सुकर केला. शेवटच्या मिनिटांपर्यंत क्रोएशियाचे खेळाडू गोल करण्यासाठी झगडताना दिसले. मात्र सामन्यात बरोबरी साधण्याची क्रोएशियाच्या खेळाडूंची धडपड वाया गेली. त्यांना गोल करण्यात अपयश आलं. या पराभवासह ‘ड’ गटातील गुणतालिकेत क्रोएशियाचा संघ चौथ्या स्थानावर गेला आहे.

पहिल्या सत्रात इंग्लंड आणि क्रोएशिया संघाला एकही गोल करता आला नाही. दोन्ही संघाना गोल करण्याच्या काही संधी चालून आल्या होत्या. मात्र त्याचं गोलमध्ये रुपांतर करण्यास दोन्ही संघांना अपयश आलं. पहिल्या सत्रात इंग्लंडचा आक्रमकपणा पाहायला मिळाला. जास्तीत जास्त वेळा फुटबॉल आपल्या ताब्यात ठेवत त्यांनी क्रोएशिया संघाची दमछाक केली. मात्र चिवट क्रोएशियाने देखील इंग्लंडला एकही गोल करू दिला नाही. इंग्लंडला २ फॉल्स तर क्रोएशियाला १ फॉल्स मिळाला. इंग्लंडला एकदा पॅनल्टी कॉर्नरही मिळाला. मात्र त्याचं गोलमध्ये रुपांतर करण्यात इंग्लंडला अपयश आलं. दोन्ही संघांना प्रत्येकी एकदा गोल करण्याची संधी आली होती. मात्र ती संधी हुकली. मैदानात गैरवर्तन केल्याने क्रोएशियाच्या डुज कॅलेटा कार याला पिवळं कार्ड दाखवण्यात आलं आहे.


आतापर्यंत या दोन्ही संघाचा इतिहास पाहिला तर दोन्ही संघ ११ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी ६ सामने इंग्लंडने तर ३ सामने क्रोएशियाने जिंकले आहेत. दोन सामने अनिर्णित राहीले आहेत. नोव्हेंबर २०१८ मध्ये शेवटचा सामना या दोघांनी खेळला होता. तो सामना इंग्लंडने २-१ ने जिंकला होता.