युरोपचा फुटबॉल वर्ल्डकप म्हणून ओळखला जाणारा युरो कप २०२० उद्या ११ जूनपासून (भारतीय वेळेनुसार १२ जून) सुरू होत आहे. फुटबॉल म्हटले, की युरोपच्या वर्चस्वाची जाणीव होते. जगातील सर्वाधिक पैसा कमावणारे खेळाडू असो किंवा फुटबॉल क्लब असो यात युरोपचे संघ आपल्याला सर्वत्र सापडतात. क्रिकेटमध्येही खेळाडू बक्कळ पैसा कमावतात, असे आपण ऐकत असतो. पण, फुटबॉल आणि क्रिकेट या दोन खेळांत पैशाच्या बाबतीत किती फरक आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

क्रिकेटमध्ये भारताव्यतिरिक्त इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ही राष्ट्रे कमाईच्या बाबतीत चांगल्या स्थितीत आहेत, मात्र इतर देश खूप मागे आहेत. बीसीसीआय हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. त्यांची टी-२० लीग आयपीएल ही क्रिकेटची सर्वात मोठी लीग आहे. जर त्याची तुलना फक्त युरो कपशी केली गेली, तर आयपीएल किती मागे आहे, हे कळते. आयपीएलमध्ये ५० कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाते. ही रक्कम क्रिकेट वर्ल्डकपच्या बक्षीस रकमेपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, जर आपण सध्याच्या युरो कपबद्दल बोललो. तर चालू हंगामात बक्षीस रक्कम म्हणून ३३०० कोटी रुपये दिले जातील. म्हणजेच ६६ पटीने पैसा ओतला जातो. याशिवाय बीसीसीआयला आयपीएलमधून सुमारे ५ हजार कोटींचा महसूल मिळतो. २०१६मध्ये झालेल्या युरो कपचा महसूल १६,२८० कोटी इतका होता. म्हणजेच सुमारे ११ हजार कोटींनी जास्त होता.

हेही वाचा –मिया, बिवी और विराट..! पाकिस्तानी क्रिकेटपटूची पत्नी आहे विराटची ‘सुपर’ फॅन

सर्वाधिक-कमाई असलेल्या ५० व्यक्तींमध्ये एकही क्रिकेटपटू नाही

अलीकडेच, फोर्ब्सने २०२१च्या सर्वाधिक-कमाई असलेल्या ५० व्यक्तींची यादी जाहीर केली. त्यात कोणताही क्रिकेटरचा समावेश नाही. आठ फुटबॉलपटूंचा या यादीत समावेश होता. पहिल्या दहा कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तीन फुटबॉलपटू आहेत. अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी ९५७ कोटी रुपयांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो ८८३ कोटी रुपयांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे, तर ब्राझीलचा नेमार ६९३ कोटी रुपयांसह सहाव्या क्रमांकावर आहे.

कोहलीपेक्षा मेस्सीकडे ७६० कोटी अधिक!

मागील वर्षी, फोर्ब्सने सर्वाधिक-कमाईच्या बाबतीत १०० खेळाडूंची यादी जाहीर केली. यात क्रिकेटर म्हणून केवळ एका खेळाडूला जागा मिळाली. भारतीय कर्णधार विराट कोहली १९७ कोटी रुपयांसह ६६व्या क्रमांकावर होता. म्हणजेच कोहलीची कमाई लिओनेल मेस्सीपेक्षा सुमारे ७६० कोटींनी कमी आहे.

आयपीएलमध्ये एका फ्रेंचायझीची कमाई किती?

आयपीएलमध्ये समाविष्ट असलेल्या एका फ्रेंचायझीला एका हंगामात सुमारे ४०० ते ५०० कोटींचा नफा होतो. यापेक्षा फुटबॉल क्लबची कमाई बर्‍याच पटीने वाढली आहे. एका अहवालानुसार, गेल्या वर्षी स्पॅनिश क्लब बार्सिलोनाने फुटबॉल क्लब म्हणून सर्वाधिक ६३०० कोटींची कमाई केली. मात्र करोनामुळे टॉप-२० क्लबला १७००० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते.

११ शहरात खेळवली जाणार युरो कप २०२० स्पर्धा

करोनामुळे गेल्या वर्षी स्थगित केलेली युरो कप स्पर्धा या वेळीही होणार की नाही याबद्दल साशंकता होती. परंतु यंदा ही स्पर्धा होणार असून तिचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. स्पर्धेच्या ६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच ११ वेगवेगळ्या शहरांमध्ये सामने होणार आहेत. युरो कप चॅम्पियन पोर्तुगाल आणि फिफा वर्ल्डकप विजेता संघ फ्रान्ससहित सर्व संघांना ६ गटात विभागण्यात आले आहे. या वेळी लंडन, ग्लासगो, कोपेनहेगन, सेव्हिल, बुडापेस्ट, एम्स्टरडॅम, रोम, म्युनिक, बाकू, बुखारेस्ट आणि सेंट पीटर्सबर्ग येथे सामने होतील. लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर या स्पर्धेची अंतिम लढत होईल.