अत्यंत भरात असलेल्या विश्वकप विजेत्या फ्रान्सच्या संघानं कडवा प्रतिस्पर्धी असलेल्या जर्मनीचा युरो कप २०२० मध्ये १-० असा पराभव केला आहे. याआधी २०१६ मध्ये फ्रान्सनं युरो कपमध्ये जर्मनीला धूळ चारली होती, त्या पराभवाचं उट्टं फेडण्याची संधी जर्मनीनं गमावली असून फ्रान्सनंच जर्मनीला १-० असं पराभूत केलं आहे. जर्मनीनं प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु फ्रान्सचा बचाव जर्मनीला भेदता आला नाही.

संपूर्ण क्रीडा विश्वाचं लक्ष लागलेला फ्रान्स वि जर्मनी युरो कप २०२० मधला साखळी सामना सुरू झाल्यानंतर विसाव्या मिनिटाला जर्मनीच्या मँट हमेल्सनं सेल्फ गोल केला नी फ्रान्सला १-० अशी आघाडी मिळाली. फ्रान्सचं आक्रमण रोखण्याचा प्रयत्न करताना हमेल्सनं मारलेल्या चेंडूवर जर्मनीवरच गोल झाला व फ्रान्सचं पारडं जड झालं.

नक्की वाचा >> EURO CUP 2020 : रोनाल्डोच्या चमकदार कामगिरीमुळे पोर्तुगालची हंगेरीवर ३-० ने मात

विश्वविजेता फ्रान्स व तगडा संघ असलेला जर्मनी यांची युरो कप २०२० मधल्या पहिल्याच सामन्यात एकमेकांशी गाठ भिडली. विश्वकप व युरो कप दोन्ही चषक दोन वेळा जिंकण्याचा पराक्रम केलेला फ्रान्स आणखी एकदा युरो कपवर नाव कोरण्यासाठी उत्सुक आहे. तर रशियामधल्या विश्व कप स्पर्धेत साखळी सामन्यातच गारद झालेली जर्मनी युरो कपमध्ये पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध करण्यास आतुर आहे.

फ्रान्सनं दोन वेळा यूरो कप जिंकला आहे. १९८४ आणि २००मध्ये फ्रान्सने विजेतेपद जिंकले होते, तर जर्मनीने तीन वेळा यूरो कप जिंकला आहे. १९७२, १९८० आणि १९९६मध्ये त्यांनी जेतेपद पटकावले आहे.

२०१६च्या यूरो कप उपांत्य सामन्यातही दोन्ही संघांचा सामना झाला होता. यात फ्रान्सने जर्मनीला २-० ने हरवून अंतिम फेरी गाठली. या सामन्यात फ्रान्सच्या अँटोईन ग्रिझ्मनने २ गोल केले. दोन्ही संघ प्रथमच एखाद्या प्रमुख टूर्नामेंटमध्ये (वर्ल्डकप / यूरो कप) गट साखळीत यंदा युरो कप २०२० मध्ये खेळले आहेत.