News Flash

यूरो कप २०२०: फ्रान्स, पोर्तुगाल आणि जर्मनीची बाद फेरीत धडक

फ्रान्स विरुद्ध पोर्तुगाल आणि जर्मनी विरुद्ध हंगेरी हे दोन्ही सामने बरोबरीत सुटल्याने तीन संघ बाद फेरीत पोहोचले आहे. फ्रान्स, जर्मनी आणि पोर्तुगालची बाद फेरीत वर्णी

यूरो कप २०२०: 'फ' गटातून फ्रान्स, पोर्तुगाल आणि जर्मनीची बाद फेरीत धडक (Photo: UEFA EURO 2020/ Twitter)

यूरो कप २०२० स्पर्धेतील खडतर अशा ‘फ’ गटातील सामन्यांकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. या गटातून कोणता संघ बाद फेरीत पोहोचेल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र फ्रान्स विरुद्ध पोर्तुगाल आणि जर्मनी विरुद्ध हंगेरी हे दोन्ही सामने बरोबरीत सुटल्याने तीन संघ बाद फेरीत पोहोचले आहे. फ्रान्स, जर्मनी आणि पोर्तुगालची बाद फेरीत वर्णी लागली आहे. त्यामुळे क्रीडा रसिकांना बाद फेरीत चांगल्या लढती पाहायला मिळणार आहेत.

फ्रान्स विरुद्ध पोर्तुगाल

गतविजेत्या पोर्तुगाल संघांला जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर हा सामना महत्त्वाचा होता. या सामन्यासाठी पोर्तुगाल संघाने आपलं कसब पणाला लावलं होतं. पोर्तुगालने पहिल्या मिनिटापासून आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली होती. स्पर्धेच्या ३० व्या मिनिटाला पोर्तगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने गोल झळकावत संघाला १-० ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दडपणात आलेल्या फ्रान्स संघाची बरोबरी साधण्यासाठी चांगलीच दमछाक झाली. फ्रान्सने पहिल्या सत्रातील शेवटच्या क्षणाला गोल झळकावत बरोबरी साधली. फ्रान्सच्या करीम बेन्झेमा याने गोल मारत संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर दोन्ही संघांनी दुसऱ्या सत्रात आपलं कसब पणाला लावलं. दुसऱ्या सत्रातील ४७ व्या मिनिटाला फ्रान्सच्या करीम बेन्झेमाने आणखी गोल झळकावला आणि संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे आधीच जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या पोर्तुगाल संघाची चांगलीच दमछाक झाली. मात्र ६० मिनिटाला ख्रिस्तियानो रोनाल्डोने गोल झळकावत संघाला बरोबरी साधून दिली. हा पेनल्टी गोल होता. त्यानंतर दोन्ही संघ विजयी गोल मारण्यासाठी धडपडत राहीले. मात्र दोन्ही संघांना अपयश आलं.

या सामन्यासाठी पोर्तुगालने ४-१-४-१, तर फ्रान्सने ४-२-३-१ अशी व्यूहरचना आखली होती. मैदानात दोन्ही संघात चुरस पाहायला मिळाली. पोर्तुगालच्या ताब्यात बॉल ४७ टक्के, तर फ्रान्सच्या ताब्यात बॉल ५३ टक्के वेळा होता. अर्थात पोर्तुगालच्या खेळाडूंनी बॉल एकमेकांकडे ५४२ वेळा, तर फ्रान्सच्या खेळाडूंनी बॉल ५९२ वेळा पास केला. या सामन्यात फ्रान्सच्या ४ खेळाडूंना पिवळं कार्ड दाखवण्यात आलं.

जर्मनी विरुद्ध हंगेरी

यूरो कप २०२० स्पर्धेतील ‘फ’ गटातील जर्मनी विरुद्ध हंगेरी सामना बरोबरी सुटला. दोन्ही संघांनी प्रत्येकी २-२ गोल नोंदवले. पहिल्या सत्रात हंगेरीने आक्रमकपणे खेळी करत ११ व्या मिनिटाला गोल मारला. हंगेरीच्यी अॅडम स्झालई याने सलई पास केलेला बॉल थेट गोलमध्ये रुपांतरीत केला. त्यामुळे जर्मनी संघावर दडपण आलं. पहिल्या सत्रात बरोबरी साधण्यात जर्मनीच्या संघाला यश आलं आलं नाही. मात्र दुसऱ्या सत्रात जर्मनीने जबरदस्त कमबॅक केलं. ६६ व्या मिनिटाला कय हावर्ट्झने गोल झळकावत बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये विजयी गोल नोंदवण्यासाठी धडप़ड सुरु झाली. अगदी दोन मिनिटांनी म्हणजेत ६८ व्या मिनिटाला हंगेरीच्या अंद्रास शेफरने गोल झळकावत २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जर्मनीने आक्रमक खेळी करत बरोबरी साधण्याची धडपड सुरु केली. अखेर ८४ व्या मिनिटाला जर्मनीला यश आलं. जर्मनीच्या लिओन गोरेटझ्काने गोल मारला आणि जर्मनीच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर शेवटच्या मिनिटापर्यंत दोन्ही संघ विजयी गोलसाठी धडपडत राहिले. मात्र दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आलं.

या सामन्यासाठी जर्मनीने ३-४-२-१, तर हंगेरीने ५-३-२ अशी व्यूहरचना आखली होती. या सामन्यात सर्वाधिक फुटबॉलवर पकड ही जर्मनी संघाची दिसून आली. जर्मनीच्या ताब्यात ७६ टक्के, तर हंगेरीच्या ताब्यात फुटबॉल २४ टक्के होता. म्हणजेच जर्मनीच्या खेळाडूंनी एकमेकांकडे सर्वाधिक वेळा फुटबॉल पास केला. जर्मनीने ७२२, तर हंगेरीने २३६ वेळा बॉल पास केला. या सामन्यात हंगेरीच्या ३, तर जर्मनीच्या २ खेळाडूंना पिवळं कार्ड दाखवण्यात आलं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2021 3:25 am

Web Title: euro cup 2020 france portugal and germany qualified for stage 16 team rmt 84
टॅग : Euro Cup 2020
Next Stories
1 ICC WTC 2021 Final : भारताला जगज्जेतेपदाची हुलकावणी!
2 Euro cup 2020 : क्रोएशिया, इंग्लंडची बाद फेरीत धडक
3 Euro cup 2020 : स्पेनचा झंझावात!
Just Now!
X