यूरो कप २०२० स्पर्धेतील खडतर अशा ‘फ’ गटातील सामन्यात जर्मनीने गतविजेत्या पोर्तुगालचा धुव्वा उडवला. या सामन्यात पोर्तुगालला दोन स्वगोल महागात पडले. त्यामुळे जर्मनीने पोर्तुगालचा ४-२ ने पराभव केला. पहिल्या सामन्यात मिळालेल्या विजयानंतर पोर्तुगालचा आत्मविश्वास दुणावला होता. मात्र जर्मनीविरुद्धच्या सामन्यात केलेल्या चुका पोर्तुगालला भोवल्या. त्यामुळे पराभवाला सामोरं जावं लागलं. सामना सुरु झाल्यानंतर पहिल्या सत्रातील १५ व्या मिनिटाला पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियाने रोनाल्डो याने गोल झळकावला आणि संघाला १ गोलची आघाडी मिळवून दिली. मात्र त्यानंतर केलेल्या चुका अंगाशी आल्या. सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला पोर्तुगालच्या रुबेन डायसने स्वगोल केल्याने जर्मनीला १-१ ने बरोबरी साधता आली. ही चूक कमी होती की काय? ३९ व्या मिनिटाला राफेल गुरेरोने तोच कित्ता गिरवला आणि स्वगोल झाला. यामुळे जर्मनीला पहिल्या सत्रात १ गोलची आघाडी मिळाली. यानंतर पोर्तुगाल संघावर दडपण आलं आणि बरोबरी साधण्यासाठी धडपड सुरु झाली.

दुसऱ्या सत्रात ५१ व्या मिनिटाला काय हॅवर्टजने गोल झळकावत जर्मनीला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्याच्या गोलमुळे वाढलेलं दडपण दूर करण्यासाठी पोर्तुगाल संघाची चांगलीच दमछाक झाली. त्यानंतर लगेचच ६० व्या मिनिटाला रॉबिन गोसेन्सनं गोल मारत जर्मनीला ४-१ अशी आघाडी मिळवून दिली. यामुळे पोर्तुगाल संघाच्या गोटात चिंता वाढली. त्यामुळे बरोबरी साधण्यासाठी धडपड सुरु झाली. अखेर ६७ व्या मिनिटाला पोर्तुगालच्या डिआगो जोताने गोल मारल्याने थोडासा दिलासा मिळाला. मात्र ४ गोलची बरोबरी काय साधता आली नाही. अखेर पोर्तुगालचा ४-२ ने पराभव झाला.

या सामन्यासाठी पोर्तुगालने ४-१-४-१ अशी रणनिती आखली होती. तर जर्मनीने ३-४-२-१ अशी व्यूहरचना आखली होती. जर्मनीच्या विजयानंतर फ गटातील गुणतालिकेचं गणित बिघडलं आहे. जर्मनीकडून मिळालेल्या पराभवानंतर पोर्तुगालचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. तर फ्रान्स आणि हंगेरी यांच्यातील सामना बरोबरीत सुटल्याने फ्रान्सचा संघ अव्वल स्थानी आहे. तर पोर्तुगालला पराभूत केल्याने जर्मनी दुसऱ्या स्थानावर आहे. आता फ्रान्स, जर्मनी आणि पोर्तुगाल संघाचं बाद फेरीतील भवितव्य आगमी सामन्यांवर अवलंबून आहे.

या सामन्यात जर्मनीचा संघ फुटबॉल स्वत:च्या ताब्यात ठेवण्यात यशस्वी ठरला. जर्मनीच्या ताब्यात फुटबॉल ५८ टक्के म्हणजेच खेळाडूंमध्ये ५८१ वेळा पास केला. तर पोर्तुगालच्या ताब्यात फुटबॉल ४२ टक्के म्हणजेच खेळाडूंना ४१९ वेळा फुटबॉल एकमेकांना पास केला. या सामन्यात जर्मनीच्या दोन खेळाडूंना पिवळं कार्ड दाखवण्यात आलं.