यूरो कप २०२० स्पर्धेतील ‘क’ गटात युक्रेन विरुद्ध ऑस्ट्रिया आणि नॉर्थ मसेडोनिया विरुद्ध नेदरलँड या संघात सामने रंगणार आहेत. या गटातून नेदरलँडची बाद फेरीत यापूर्वीच वर्णी लागली आहे. तर नॉर्थ मसेडोनियाचा संघ सलग दोन सामने हरल्याने स्पर्धेबाहेर गेला आहे. मात्र आजच्या युक्रेन विरुद्ध ऑस्ट्रिया या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ची लढाई आहे. हा सामना जिंकणाऱ्याला बाद फेरीचं तिकीट मिळणार आहे. तर हरणारा संघ स्पर्धेबाहेर जाणार आहे.

युक्रेन विरुद्ध ऑस्ट्रिया

युक्रेन विरुद्ध ऑस्ट्रिया या दोन्ही संघांसाठी आजचा सामना करो या मरोची लढाई आहे. या सामन्यात एकाला बाद फेरीचं तिकीट, तर एकाला थेट स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात चुरस पाहायला मिळणार आहे. युक्रेन यापूर्वी नेदरलँड आणि नॉर्थ मसेडोनिया संघासोबत सामने खेळला आहे. नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात युक्रेनला ३-२ ने पराभव सहन करावा लागला होता. तर युक्रेनने नॉर्थ मसेडोनिया संघाला २-१ ने पराभूत केलं होतं. तर दुसरीकडे ऑस्ट्रिया संघाने नॉर्थ मसेडोनिया संघाला ३-१ ने पराभूत केलं होतं. तर नेदरलँडकडून २-० असा पराभव सहन करावा लागला होता. त्यामुळे युक्रेन आणि ऑस्ट्रिया या दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्त्वाचा आहे.

यापूर्वी युक्रेन आणि ऑस्ट्रिया दोनदा आमनेसामने आले आहेत. दोघांनी एक एक सामना जिंकला आहे. या दोन सामन्यात एकूण ८ गोलची नोंद आहे. तर मोठ्या स्पर्धेत पहिल्यांदाच हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

नेदरलँड विरुद्ध नॉर्थ मसेडोनिया

नेदरलँड विरुद्ध नॉर्थ मसेडोनिया हा सामना केवळ औपचारिकता असणार आहे. नेदरलँडने सलग दोन सामने जिंकल्याने त्यांचं बाद फेरीतील स्थान निश्चित झालं आहे. तर नॉर्थ मसेडोनियाचा सलग दोन सामन्यात पराभव झाल्याने स्पर्धेबाहेर गेला आहे. त्यामुळे हा सामन्यात जय पराजय केवळ औपचारिकता असणार आहे. नेदरलँडने सलग दोन विजय मिळवल्याने त्यांचा या स्पर्धेतील आत्मविश्वास दुणावला आहे. तर नॉर्थ मसेडोनिया संघाचा स्पर्धेतील शेवट गोड करून परतण्याचा मानस असणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारेल? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

नेदरलँड नॉर्थ मसेडोनिया संघाविरुद्ध कधीच पराभूत झालेला नाही. मागच्या चार सामन्यात नेदरलँडला दोन सामन्यात विजय, तर दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.