यूरो कप २०२० स्पर्धेतील ‘अ’ गटातील साखळी फेरीतील सामने संपले असून इटली आणि वेल्सने बाद फेरीत धडक मारली आहे. तर स्वित्झर्लंडच्या आशा अजूनही कायम आहेत. या गटात इटलीने सलग तीन सामने जिंकले असून बाद फेरीत सर्वात प्रथम धडक मारली. मात्र वेल्स आणि स्वित्झर्लंड संघात बाद फेरीसाठी चुरस होती. दोघांचे समसमान गुण आहेत. सहा गटातून १६ संघांना बाद फेरीत जाण्याची संधी आहे. त्यामुळे अजूनही स्वित्झर्लंडच्या आशा कायम आहेत. यूरो कप २०२० स्पर्धेत एकूण २४ संघ खेळत आहेत.

इटलीचा वेल्सवर १-० ने विजय

इटलीने वेल्सविरुद्धचा सामना १-० ने जिंकत या स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळवला आहे. पहिल्या सत्रात इटलीच्या मटेओ पेस्सिना याने गोल झळकावला. यामुळे इटलीला १ गोलची आघाडी मिळाल्याने वेल्स संघावर दडपण आलं. हे दडपण शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिलं. मात्र बरोबरी साधण्यास अपयश आलं. वेल्सच्या संघाची चांगलीच दमछाक झाली. दुसऱ्या सत्रात गैरवर्तुणूक केल्याप्रकरणी इथान एम्पाडू याला रेड कार्ड दाखवण्यात आलं. ५५ व्या मिनिटाला त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळे उर्वरित मिनिटं वेल्सला १० खेळाडूंसह मैदानात खेळावं लागलं. वेल्स आणि स्वित्झर्लंड संघाचे समसमान गुण आहेत. तरी सरासरीत वेल्स संघ अव्वल ठरल्याने बाद फेरीतील तिकीट मिळालं आहे.

या सामन्यात वेल्सच्या दोन आणि इटलीच्या एका खेळाडूला पिवळं कार्ड दाखवण्यात आलं. या सामन्यात इटली वरचढ दिसून आली. फुटबॉलचा ताबा इटलीकडे ७० टक्के तर वेल्सकडे ३० टक्के होता. इटलीने ५९४ वेळा फुटबॉल एकमेकांकडे पास केला. तर वेल्सने २६३ वेळा फुटबॉल एकमेकांकडे पास केला.

स्वित्झर्लंडची टर्कीवर ३-१ ने मात

‘अ’ गटातील दुसरा सामना स्वित्झर्लंड आणि टर्की या दोन संघात रंगला. स्वित्झर्लंडने टर्कीला ३-१ ने पराभूत केलं. टर्कीचा या स्पर्धेतील सलग तिसरा पराभव आहे. मात्र विजय मिळवूनही बाद फेरीतील स्थान निश्चित नाही. त्यामुळे आता गुणतालिकेतील गुणावर आता त्यांचं बाद फेरीतील भवितव्य अवलंबून आहे. सामना सुरु झाल्यानंतर सामन्याच्या सहाव्या मिनिटाला स्वित्झर्लंडच्या हॅरिस सेफेरोविक याने गोल झळकावला. त्यानंतर स्केरडन शाकिरी याने स्वित्झर्लंडच्या गोलमध्ये भर पाडली आणि दोन गोलची आघाडी मिळवून दिली. २६ मिनिटाला त्याने गोल मारला. दुसऱ्या सत्रात आत्मविश्वास गमावलेला टर्कीचा संघ झगडताना दिसला. ६२ व्या मिनिटाला टर्कीच्या इरफान काव्हेकी याने गोल झळकावला. त्यानंतर ६८ व्या मिनिटाला स्वित्झर्लंडच्या स्केरडने सामन्यातील तिसरा आणि वैयक्तिक दुसरा गोल झळकावला. यासह स्वित्झर्लंडने टर्कीवर ३-१ ने विजय मिळवला. मात्र सरासरीत मागे पडल्याने स्वित्झर्लंडचा आता इतर संघाच्या सामन्यांवर बाद फेरीचं गणित अवलंबून आहे.

स्वित्झर्लंडने टर्कीवर ३-१ ने आघाडी मिळवली. शेवटच्या मिनिटापर्यंत हे गणित कायम राहिलं. या सामन्यात फुटबॉलवर सर्वाधिक ताबा हा स्वित्झर्लंड संघाचा होता. ५१ टक्के म्हणजेच ४८० वेळा फुटबॉल स्वित्झर्लंडच्या खेळाडूंनी एकमेकांकडे पास केला. या सामन्यात टर्कीच्या ३, तर स्वित्झर्लंडच्या एका खेळाडूला पिवळं कार्ड दाखवण्यात आलं.