यूरो कप २०२० स्पर्धेला आता खऱ्या अर्थाने रंगत चढू लागली आहे. एक एक करत संघ आता बाद फेरीत पोहोचत आहे. तर काही संघाची बाद फेरीत पोहोचण्यासाठी धडपड सुरु झाली आहे. आज स्वीडन विरुद्ध स्लोवाकिया, क्रोएशिया विरुद्ध चेक रिपब्लिक आणि इंग्लंड विरुद्ध स्कॉटलँड यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यातील निकालानंतर बाद फेरीतील चित्र स्पष्ट होत जाणार आहे. त्या त्या गटात अव्वल असलेल्या संघाचं बाद फेरीत स्थान निश्चित होणार आहे. त्यामुळे बाद फेरीतील आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी संघ आक्रमकपणे खेळताना दिसणार आहेत.

स्वीडन विरुद्ध स्लोवाकिया

यूरो कप २०२० स्पर्धेतील ‘इ’ गटात आज स्लोवाकिया आणि स्वीडन यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात स्लोवाकियाने विजय मिळवल्यास त्यांचं बाद फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. मात्र त्याने हा सामना गमवल्यास ‘इ’ गटात चारही संघामध्ये चुरस निर्माण होईल. दुसरीकडे स्वीडनने हा सामना गमवल्यास त्याचं बाद फेरीतील आशा धुसर होतील. कारण उर्वरित संघाच्या कामगिरीवर त्यांचं भविष्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे स्वीडनसाठी आजचा सामन्यात ‘करो या मरो’ची स्थिती असणार आहे.

क्रोएशिया विरुद्ध चेक रिपब्लिक

यूरो कप २०२० स्पर्धेतील ‘ड’ गटातील तिसरा सामना आज क्रोएशिया आणि चेक रिपब्लिक या संघात रंगणार आहे. चेक रिपब्लिकने यापूर्वीच्या सामन्यात स्कॉटलँडला पराभूत केल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास त्यांचं बाद फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. तर क्रोएशियाने हा सामना गमवल्यास त्यांच्या बाद फेरीतील आशा संपुष्टात येतील.

इंग्लंड विरुद्ध स्कॉटलँड

यूरो कप २०२० स्पर्धेत ‘ड’ गटातील चौथा सामना इंग्लंड विरुद्ध स्कॉटलँड या संघात रंगणार आहे. या सामन्यात इंग्लंडचं पारडं जड आहे. त्यात पहिल्या सामन्यात क्रोएशियाचा पराभव केल्याने इंग्लंडचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून बाद फेरीत स्थान मिळवण्याचा इंग्लंड संघाचा प्रयत्न आहे. तर स्कॉटलँडसाठी ही ‘करो या मरो’ची लढाई आहे. हा सामना गमवल्यास बाद फेरीत पोहोचण्याच्या आशा मावळणार आहेत.

आजच्या यूरो चषक २०२० स्पर्धेतील लढती

  • स्वीडन विरुद्ध स्लोवाकिया (आज संध्या. ६.३० वाजता)
  • क्रोएशिया विरुद्ध चेक रिपब्लिक (आज रात्री ९.३० वाजता)
  • इंग्लंड विरुद्ध स्कॉटलँड (रात्री १२.३० वाजता)