यूरो कप २०२० स्पर्धेत आता बाद फेरीत पोहोचण्यासाठी चढाओढ सुरु आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघाचे तीन सामने आहेत. या तीन सामन्यांच्या कामगिरीवर बाद फेरीतील भविष्य अवलंबून आहे. इटली, बेल्जियम आणि नेदरलँड संघाने सुरुवातीच्या दोन सामन्यात विजय मिळवल्याने त्यांचं बाद फेरीतील स्थान निश्चित झालं आहे. ‘अ’ गटातील इटली संघाने टर्की आणि स्वित्झर्लंडला नमवत बाद फेरीत धडक मारली आहे. ‘ब’ गटातील बेल्जियम संघाने रशिया आणि डेन्मार्क पराभूत करत बाद फेरीत स्थान निश्चित केलं आहे. तर ‘क’ गटातील नेदरलँडने युक्रेन आणि ऑस्ट्रियाला नमवत बाद फेरीत स्थान पक्कं आहे.

नेदरलँडने ऑस्ट्रियाचा २-० ने पराभव केला. या सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर नेदरलँडचं बाद फेरीतील स्थान निश्चित झालं आहे. पहिल्या सत्रात नेदरलँडने आक्रमक खेळी करत ऑस्ट्रियावर १-० ने आघाडी घेतली होती. सामना सुरु झाल्यानंतर ११ व्या मिनिटाला मेमफीस डिपेने गोल झळकावला. या गोलमुळे ऑस्ट्रियावर दडपण वाढलं. त्यात स्पर्धेतील पहिला सामना गमवल्याने त्यांच्यावरील दबाव वाढला होता. याचा फायदा नेदरलँड संघाने उचलला. त्यांना गोल करण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या सत्रातही नेदरलँडचा संघ वरचढ ठरला. नेदरलँडच्या डेन्झेल डमफ्राइजने ६७ व्या मिनिटाला गोल झळकावला आणि सामन्यात २-० ने आघाडी मिळवून दिली. मात्र ऑस्ट्रिया संघाला एकही गोल करता आला नाही. या पराभवासह ऑस्ट्रियाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

नेदरलँड संघाने या सामन्यासाठी ३-४-१-२, तर ऑस्ट्रियाने ३-१-४-२ अशी रणनिती आखली होती. या सामन्यात गैरवर्तन केल्याने ऑस्ट्रियाच्या दोन, तर नेदरलँडच्या एका खेळाडूला पिवळं कार्ड दाखवण्यात आलं. नेदरलँडपेक्षा ऑस्ट्रिया संघाने जास्तीत जास्त वेळा फुटबॉल आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवलं. मात्र त्याचं गोलमध्ये रुपांतर करण्यात अपयश आलं. ऑस्ट्रियाच्या खेळाडूंनी एकमेकांना ५३१ पास दिले. तर नेदरलँडच्या खेळाडूंनी एकमेकांना ४७९ पास दिले. या सामन्यात नेदरलँडला ३ तर ऑस्ट्रियाला ५ कॉर्नर मिळाले होते.