यूरो कप २०२० स्पर्धेतील बाद फेरीच्या सामन्यांना रंगत चढू लागली आहे. इटली आणि डेन्मार्कने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. त्यानंतर आज नेदरलँड विरुद्ध चेक रिपब्लिक आणि बेल्जियम विरुद्ध पोर्तुगाल यांच्यात सामना रंगणार आहे. त्यामुळे या दोन सामन्यातून कोणता संघ उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

नेदरलँड विरुद्ध चेक रिपब्लिक

नेदरलँड संघाने यूरो कप २०२० साखळी स्पर्धेतील तिन्ही सामने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात युक्रेनचा ३-२ ने, दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रियाचा २-० ने, तर तिसऱ्या सामन्यात नॉर्थ मसेडोनिया संघाचा ३-० ने पराभव केला. त्यामुळे नेदरलँड संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. दुसरीकडे चेक रिपब्लिक संघाची बाद फेरीतील धडक गुण सरासरीमुळे झाली आहे. साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात स्कॉटलँडचा २-० ने पराभव केला. त्यानंतर क्रोएशिया विरुद्धचा दुसरा सामना बरोबरीत सुटला. तर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडकडून १-० ने पराभव सहन करावा लागला होता.
नेदरलँड आणि चेक रिपब्लिक संघ ऑक्टोबर २०१५ नंतर पहिल्यांदाच आमनेसामने येत आहेत. यूरो कप २०१६ च्या क्लालिफाय फेरीत हे दोन संघ समोरासमोर आले होते. तेव्हा नेदरलँड संघाचा चेक रिपब्लिकने ३-२ ने धुव्वा उडवला होता. अर्थात, मागचे दोन्ही सामने नेदरलँडने गमावले आहेत. असं असलं तरी यूरो कप २०१६ स्पर्धेत दोन्ही संघांनी क्लालिफाय केलं होतं. नेदरलँड आणि चेक रिपब्लिक यूरो कप स्पर्धेच्या इतिहासात तिसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

बेल्जियम विरुद्ध पोर्तुगाल

बेल्जियम विरुद्ध पोर्तुगाल सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो चांगलाच फॉर्मात आहे. त्याने मागच्या तिन्ही सामन्यात गोल झळकावले आहेत. पोर्तुगालने पहिल्या सामन्यात हंगेरीचा ३-० ने पराभव केला. दुसऱ्या सामन्यात जर्मनीकडून ४-२ ने पराभव सहन करावा लागला. त्यानंतर फ्रान्सविरुद्धचा तिसरा सामना बरोबरीत सुटला. दुसरीकडे बेल्जियमने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात रशियाचा ३-० ने, दुसऱ्या सामन्यात डेन्मार्कचा २-१ ने आणि तिसऱ्या सामन्यात फिनलँडचा २-० ने पराभव केला. त्यामुळे बेल्जियमचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. असं असलं तरी पोर्तुगालाच कडवं आव्हान पेलावं लागणार आहे.
बेल्जियम आणि पोर्तुगाल हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एका मोठ्या स्पर्धेत आमनेसामने येत आहेत. मागच्या ५ सामन्यात पोर्तुगालने बेल्जियमला पराभवाची चव चारली आहे.