यूरो कप २०२० स्पर्धेत चेक रिपब्लिकने ‘ऑरेंज आर्मी’ नेदरलँड्सला चकित करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. हंगेरीच्या पुस्कास एरेनावर रंगलेल्या सामन्यात चेक रिपब्लिकने दुसऱ्या सत्रात केलेल्या आक्रमणाच्या जोरावर नेदरलँड्सला २-० ने पराभूत केले. चेक रिपब्लिकसाठी होल्स आणि फॉर्मात असलेल्या पॅट्रिक शिकने गोल केले. उपांत्यपूर्व फेरीत चेक रिपब्लिकचा सामना डेन्मार्कशी होणार आहे. ३ जुलैला हा सामना अझरबायजेनच्या बाकू ऑलिम्पिक स्टेडियमवर होणार आहे.

दुसरे सत्र

दुसऱ्या सत्रात चेक रिपब्लिकने आपले आत्रमण वाढवले. ५४व्या मिनिटाला नेदरलँड्सच्या डिलिटने हाताने गोल अडवला. त्यामुळे त्याला लाल कार्ड मिळाले. त्यानंतर नेदरलँड्सने १० खेळाडूंसह सामना खेळण्यास सुरुवात केलीय. फ्री किक मिळालेल्या चेक रिपब्लिकला या संधीचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. त्याच्या पुढच्या मिनिटाला चेक रिपब्लिकच्या कोफारला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. ६८व्या मिनिटाला टॉमस होल्सने अप्रतिम हेडर मारत चेक रिपब्लिकसाठी पहिला गोल नोंदवला. यूरो कप २०२०मध्ये जबरदस्त कामगिरी केलेल्या पॅट्रिक शिकने ८०व्या मिनिटाला गोल करत चेक रिपब्लिकसाठी विजयी आघाडी घेतली. अतिरिक्त ५ मिनिटांच्या वेळेत नेदरलँड्सला ही पिढाडी भरून काढणे कठीण गेले.

 

पहिले सत्र

तब्बल ६० हजारांच्या प्रेक्षकसंख्येसह या सामन्याला सुरुवात झाली. सामन्याच्या सातव्या मिनिटाला नेदरलँड्सने पहिला गोल करण्याची संधी चुकवली. या संघाने यूरो कप २०२०मध्ये सर्वाधिक गोल केले आहेत. २०व्या मिनिटांपर्यंत नेदरलँड्स चेक रिपब्लिकपेक्षा अधिक आक्रमकतेने खेळत होता. ही परिस्थिती पाहून चेक रिपब्लिकने पलटवार करण्यास सुरुवात केली. २१व्या मिनिटाला चेक रिपब्लिकच्या कर्णधाराने हेडरने करण्याचा गोल चुकवला. ३७व्या मिनिटाला चेक रिपब्लिकच्या बराकला संघासाठी पहिला गोल करता आला असता, पण त्याने मारलेला चेंडू गोलपोस्टच्या वरून गेला. पहिल्या सत्रात २ मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. मात्र त्यातही दोन्ही संघांना त्यांचा पहिला गोल करता आला नाही.

नेदरलँड विरुद्ध चेक रिपब्लिक

नेदरलँड्स संघाने यूरो कप २०२० साखळी स्पर्धेतील तिन्ही सामने जिंकले होते. पहिल्या सामन्यात युक्रेनचा ३-२ ने, दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रियाचा २-० ने, तर तिसऱ्या सामन्यात नॉर्थ मॅसेडोनिया संघाचा ३-० ने पराभव केला. त्यामुळे नेदरलँड्स संघाचा आत्मविश्वास दुणावला होता. दुसरीकडे चेक रिपब्लिक संघाची बाद फेरीतील धडक गुण सरासरीमुळे झाली. साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात स्कॉटलँडचा २-० ने पराभव केला. त्यानंतर क्रोएशिया विरुद्धचा दुसरा सामना बरोबरीत सुटला. तर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडकडून १-० ने पराभव सहन करावा लागला होता.

 

 

नेदरलँड्स आणि चेक रिपब्लिक संघ ऑक्टोबर २०१५ नंतर पहिल्यांदाच आमनेसामने आले होते.  यूरो कप २०१६च्या पात्रता फेरीत हे दोन संघ समोरासमोर आले होते. तेव्हा नेदरलँड्स संघाचा चेक रिपब्लिकने ३-२ ने धुव्वा उडवला होता. अर्थात, मागचे दोन्ही सामने नेदरलँड्सने गमावले आहेत. असे असले तरी यूरो कप २०१६ स्पर्धेत दोन्ही संघांनी क्लालिफाय केले होते. नेदरलँड्स आणि चेक रिपब्लिक यूरो कप स्पर्धेच्या इतिहासात तिसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले होते.