यूरो कप २०२० स्पर्धेतील रशिया विरुद्ध फिनलँड सामन्यात रशियाने बाजी मारली. रशियाने फिनलँडचा १-० ने पराभव केला. या विजयासह रशियाने स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. या सामन्यात एकूण वेळेचा विचार केल्यास रशियाने ५९ टक्के अर्थात ५८० वेळा फुटबॉल पास करत आपल्या ताब्यात ठेवला होता. तर फिनलँडने ४१ टक्के अर्थात ४०४ वेळा पास करत फुटबॉल आपल्या ताब्यात ठेवला होता. या सामन्यात फिनलँडला १ तर रशियाला ४ कॉर्नर मिळाले. यात फिनलँड टार्गेटवर एकदा स्ट्राईक करण्यास यशस्वी ठरला. मात्र रशियन गोलकिपरने गोल अडवला. रशियाने या विजयाससह ‘ब’ गटातील गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. या गटात बेल्जियमचा संघ अव्वल स्थानी आहे. तर आजच्या पराभवामुळे फिनलँडचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर डेन्मार्क एका पराभवासह चौथ्या स्थानावर आहे. रशियाचा पुढचा सामना २२ जून रोजी डेन्मार्कसोबत आहे. तर फिनलँडला बलाढ्य बेल्जियमशी २२ जून रोजी सामना करायचा आहे.

पहिल्या सत्रात रशियाने गोल केल्याने फिनलँड संघावर दडपण आणलं. एलेक्से मिरानच्युक याने गोल झळकावला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात बरोबरी साधण्यासाठी फिनलँडच्या संघाची धडपड सुरु होती. मात्र त्यांच्या सर्व प्रयत्नांना अपयश आलं. या पराभवामुळे फिनलँडचं  बाद फेरीत जाण्याचं आव्हान खडतर झालं आहे. आता पुढचा सामना फिनलँडला मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. पहिल्या सत्रात रशियाच्या दोन, तर फिनलँडच्या एका खेळाडूला पिवळं कार्ड दाखवण्यात आलं.

या सामन्यासाठी फिनलँडने ३-५-२ अशी रणनिती आखली होती. तर रशियाने ४-३-३ या व्यूहरचनेसह मैदानात उतरली होती. आतापर्यंत दोन्ही संघामध्ये पाच सामने झाले आहेत. हे पाचही सामने रशियाने जिंकले आहेत. या चार सामन्यात रशियाने १६ तर फिनलँडने १ गोल केला आहे. फिनलँडसाठी एकमेव गोल १९९५ साली किम सोमिनेन यांनी केला होता. रशियाने फिनलँडला ऑगस्ट १९९५ मध्ये ६-० ने पराभूत केलं होतं.

दोन्ही संघातील ११ खेळाडू

फिनलँड- एल. ह्रडेकी, जे. टोयवियो. पी. अराजुरी, डी. ओशॉघनेसी, जे. रायतला, आर. शुलर, जी. कमारा. जे. युरोनेन, आर. लोड, जे. पोहजनपालो, टी. पुक्की

रशिया- एम. सॅफोनोव्ह, डी. कुझ्यायेव, जी. झिकिया, एल. डिव्हीव, एम. फर्नांडीस, आर. झोबनिन, डी. बरिनोव्ह, एम. ओझडोएव, ए. गोलोविन, ए. झ्युबा, ए. मिरानच्युक