यूरो कप २०२० या स्पर्धेवर करोनाचं सावट कायम आहे. स्पेन, नेदरलँड आणि स्वीडनच्या खेळाडूंना करोना झाल्यानंतर आता रशियाच्या खेळाडूला करोनाची लागण आहे. रशियाचा फुटबॉलपटू अंद्रेय मोस्तोवोय याला करोना झाल्याचं निष्पन्न झाल्याने त्याला स्पर्धेतून बाहेर जावं लागलं आहे. त्याच्याऐवजी रोमन येव्गेनेयव्ह याला संघात संधी देण्यात आली आहे. स्पर्धेपूर्वी खेळाडूंची करोना पीसीआर चाचणी करण्यात आली. यावेळी फुटबॉलपटू अंद्रेय मोस्तोवोय याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं.

“अंद्रेय मोस्तोवोय याची करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्याच्या ऐवजी डिफेन्डर रोमन येव्गेनेयव्हला संधी देण्यात आली आहे.”, असं रशियन संघाकडून सांगण्यात आलं आहे. रशियाचा पुढचा सामना १३ जून रोजी बेल्जियमसोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री १२. ३० वाजता हा सामना रंगणार आहे.

करोना संकटामुळे स्पर्धेचे नवे नियम

  • २६ खेळाडूंच्या फुटबॉल संघाला मंजुरी देण्यात आली आहे. असं असलं तरी प्रशिक्षकला आपल्या अंतिम संघात २३ खेळाडूंची नोंद करावी लागणार आहे. यात ११ खेळाडू मैदानात तर १२ खेळाडू राखीव असणार आहेत.
  • करोनामुळे जर काही खेळाडूंना तात्काळ क्वारंटाइन व्हावं लागलं. तरी संघाकडे १३ खेळाडू असतील. त्यामुळे सामना खेळला जाणार आहे.
  • करोनामुळे सामना झाला नाही तर त्या सामन्याचं ४८ तासात आयोजन करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. तरीही सामना झाला नाही तर ज्या संघामुळे सामना रद्द झाला. त्या संघाला ३-० ने पराभूत समजलं जाईल.
  • करोनाचं संकट पाहता समितीने ५ बदली खेळाडूंची परवानगी देली आहे. यापूर्वी ३ बदली खेळाडू खेळवण्याची संमती होती. यामुळे खेळाडूंवरील दबाव कमी होणार आहे.
  • फुटबॉल स्पर्धा ९० मिनिटांची असते. मात्र अनिर्णित स्पर्धेमुळे वाढीव वेळ देण्यात येतो. अशावेळी सहावा बदली खेळाडू खेळवण्यास संमती देण्यात आली आहे.
  • ९० मिनिटांच्या खेळात खेळाडू बदलण्याच्या ३ संधी असतील. वाढीव वेळेत चौथ्या बदलला मंजुरी देण्यात आली आहे.

Euro cup 2020: स्पर्धेपूर्वी संपूर्ण स्पेन संघाचं करोना लसीकरण

यूरो कप २०२०चं आयोजन गेल्या वर्षी होणार होतं. मात्र करोना संकटामुळे गेल्या वर्षीचं आयोजन टाळण्यात आलं. मात्र तरीही या स्पर्धेचं नाव UEFA Euro Cup २०२० ठेवायचा प्रस्ताव कार्यकारी समितीने मंजूर केला. २०२० साली या स्पर्धेला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने या स्पर्धेची रुपरेषा आखण्यात आली होती. त्यासाठी या स्पर्धेचं नाव UEFA Euro Cup २०२१ ऐवजी UEFA Euro Cup २०२० असंच ठेवण्यात आलं आहे.