यूरो कप २०२० स्पर्धेतील साखळी सामने रंगतदार वळणावर आले आहेत. सामन्यातील जय पराजयावर बाद फेरीतील दरवाजाची किल्ली मिळणार आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघाचे तीन सामने आहेत. काही संघांनी दोन सामन्यात विजय मिळवल्याने त्यांचं बाद फेरीतील स्थान निश्चित झालं आहे. मात्र इ गटात स्वीडनने स्लोवाकियाचा पराभव केल्याने बाद फेरीचं गणित कोलमडून गेलं आहे. आता तीन संघामध्ये बाद फेरीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

स्वीडनचा स्पेन विरुद्धच्या सामना गोलरहित बरोबरीत सुटला होता. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला होता. तर दुसऱ्या सामन्यात स्लोवाकियाला पराभूत केल्याने आता स्वीडनच्या खात्यात ४ गुण जमा झाले आहे. तर या पराभवामुळे स्लोवाकियाच्या खात्यातील ३ गुण जैसे थेच आहेत. स्लोवाकियाने यापूर्वीच्या सामन्यात पोलंडला २-१ ने पराभूत केलं होतं. त्यामुळे आता उर्वरित पुढच्या सामन्यांवर भवितव्य अवलंबून आहे.

दुसऱ्या सत्रात स्लोवाकियाविरुद्ध स्वीडनने आक्रमक खेळी केली. दुसऱ्या सत्रात ७७ व्या मिनिटाला इमिल फोर्सबर्ग याने गोल झळकावला. पेनल्टी गोल मारण्यात आला. हा गोल गोलकिपरला अडवता आला नाही. या गोलसह स्वीडनने सामन्यात आघाडी घेतली. त्यामुळे स्लोवाकिया संघावर दडपण आलं आणि शेवटच्या मिनिटापर्यंत बरोबरी करण्यासाठी धडपड करत राहीला. मात्र गोल झळकावता आला नाही.

या सामन्यात मैदानातील खेळी पाहिली तर जास्तीत जास्त वेळ फुलबॉल स्लोवाकियाच्या ताब्यात होता. स्लोवाकियाने ६०६ वेळा आपल्या खेळाडूंकडे फुटबॉल पास केला. तर स्वीडनने ४३१ वेळा आपल्या खेळाडूंकडे फुटबॉल पास केला. या सामन्यात स्लोवाकियाच्या ३, तर स्वीडनच्या एका खेळाडूला मैदानात गैरवर्तन केल्याने पिवळं कार्ड दाखवण्यात आलं. या सामन्यासाठी स्वीडनने ४-४-२, तर स्लोवाकियाने ४-२-३-१ अशी व्यूहरचना आखली होती.