यूरो कप २०२० स्पर्धेतील बाद फेरीतील गुंता आता सुटत चालला आहे. आज होणाऱ्या तीन सामन्यांनंतर हे चित्र आणखी स्पष्ट होणार आहे. सध्या अधिकृतरित्या इटली, बेल्जियम आणि नेदरलँड संघाने बाद फेरीत धडक मारली आहे. तर काही संघांचं गणित जर तर वर अवलंबून आहे. आज ‘फ’ गटात दोन सामने आहेत. यात हंगेरी विरुद्ध फ्रान्स आणि पोर्तुगाल विरुद्ध जर्मनी हे दोन संघ आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे ‘फ’ गटातील बाद फेरीचं चित्र स्पष्ट होईल. तर ‘इ’ गटात स्पेन विरुद्ध पोलंड संघ भिडणार आहेत. या गटात बाद फेरीतील गणिताचा गुंता झाला आहे. पोलंडने स्लोवाकिया विरुद्धचा पहिला सामना गमावला आहे. तर स्पेन आणि स्वीडन यांच्यातील सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे गुणतालिकेतील वजाबेरीज पाहता कोणता संघ बाद फेरीत पोहोचेल हे स्पष्ट व्हायला आणखी दोन सामन्यांची प्रतिक्षा करावी लागेल.

हंगेरी विरुद्ध फ्रान्स

फ्रान्सने यूरो चषक २०२० स्पर्धेतील पहिला सामना जिंकला आहे. फ्रान्सने जर्मनीला १-० ने पराभूत केलं होतं. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. तर हंगेरीने पोर्तुलग विरुद्धचा सामना ३-० ने गमावला आहे. त्यामुळे त्यांना स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे.

यूरो कप इतिहासात हंगेरी आणि फ्रान्स हे दोन संघ पहिल्यांदाच आमनेसामने येत आहेत. यापूर्वी मोठ्या स्पर्धेत हे दोन संघ दोनदा एकमेकांना भिडले होते. या दोन्ही सामन्यात फ्रान्सने विजय मिळवला होता. विश्वचषक १९७८ मध्ये फ्रान्सने हंगेरीचा ३-१ ने पराभव केला होता. तर १९८६ च्या विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सने हंगेरीला ३-० ने नमवलं होतं.

पोर्तुगाल विरुद्ध जर्मनी

यूरो चषक २०२० स्पर्धेतील ‘फ’ गटातील आजच्या दिवशीचा दुसरा सामना पोर्तुगाल विरुद्ध जर्मनी असा रंगणार आहे. पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो चांगल्या फॉर्मात असल्यामुळे या लढतीला एकप्रकारे रोनाल्डो विरुद्ध जर्मनी असे स्वरूप प्राप्त झाले आहे. स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी जर्मनीला विजय मिळवणे अत्यावश्यक आहे.

जोकिम ल्यू यांच्या प्रशिक्षणाखाली अखेरची स्पर्धा खेळणाऱ्या जर्मनीला पहिल्या लढतीत फ्रान्सकडून ०-१ असा पराभव पत्करावा लागला. मॅट्स हुमेल्सने केलेला स्वयंगोल जर्मनीला महागात पडला. फ्रान्सने नोंदवलेले दोन गोल ऑफ-साइड ठरवण्यात आले असले, तरी यामुळे जर्मनीच्या बचाव फळीच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या. त्यामुळे आता जर्मनीने कामगिरी उंचावणे गरजेचे आहे.

जर्मनी-पोर्तुगाल यांच्यात आतापर्यंत १८ सामने झाले असून जर्मनीने १०, तर पोर्तुगालने तीन लढती जिंकल्या आहेत. पाच सामने बरोबरीत सुटले आहेत. तर युरो चषकात जर्मनी-पोर्तुगाल सहाव्यांदा आमनेसामने येत असून पोर्तुगालने २०००मध्ये जर्मनीविरुद्ध या स्पर्धेतील अखेरचा विजय मिळवला आहे.

स्पेन विरुद्ध पोलंड

यूरो कप २०२० स्पर्धेतील सर्वाधिक गुंता हा ‘इ’ गटात पाहायला मिळत आहे. स्वीडन आणि स्लोवाकिया दोन संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. तर स्पेनने स्वीडनसोबत खेळलेला पहिला सामना बरोबरीत सुटला होता. तर पोलंडला स्लोवाकियाने पराभूत केलं होतं. आजचा सामना स्पेननं जिंकल्यात स्वीडन, स्लोवाकिया आणि स्पेन या संघात बाद फेरीची चुरस निर्माण होईल. जर हा सामना पोलंडने जिंकल्यास स्पेनचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे स्पेन आणि पोलंडसाठी हा सामना ‘करो या मरो’ची लढाई आहे.