यूरो कप स्पर्धेतील साखळी सामन्यात युक्रेननं नॉर्थ मसेडोनिया संघाला २-१ ने मात दिली. या विजयासाह युक्रेननं स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. मात्र नॉर्थ मसेडोनिया संघाचा सलग दुसरा पराभव झाल्याने स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. आता गुणतालिकेतील सरासरी आणि पुढचा सामना जिंकल्यावर नॉर्थ मसेडोनियाला बाद फेरीत जाण्याची संधी मिळेल. मात्र हे गणित वाटतं तितकं सोपं नाही. युक्रेननं पहिल्या सत्रात नॉर्थ मसेडोनियावर २ गोलची आघाडी मिळवत दडपण आणलं होतं. हे दडपण दुसऱ्या सत्रातही कायम होतं. दोन गोल करत बरोबरी साधण्यासाठी नॉर्थ मसेडोनिया संघाची धडपड सुरु होती. यात नॉर्थ मसेडोनिया संघाला एक गोल करण्यात यश आलं. मात्र बरोबरी साधता आली नाही. नॉर्थ मसेडोनियाच्या अलिओस्कीने ५७ व्या मिनिटाला गोल झळकावत संघावरच दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आलं नाही.

पहिल्या सत्रात युक्रेनने आक्रमक खेळी करत नॉर्थ मसेडोनिया संघाची चांगलीच दमछाक केली. अँड्रिय यारमोलेन्को याने २९ व्या मिनिटाला गोल झळकावला. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांनी म्हणजेच ३४ व्या मिनिटाला रोमन यारेम्युचुक याने गोल झळकावत संघाला दोन गोलची आघाडी मिळवून दिली.

पहिल्या सत्रात युक्रेनने गोलच्या दिशेने ४ शॉट्स मारले. त्यात त्यांना दोन गोल झळकवता आले. तर नॉर्थ मसेडोनिया अशी संधी एकदाही मिळाली नाही. युक्रेननं फुटबॉल जास्तीत जास्त वेळ आपल्या ताब्यात ठेवला. पहिल्या सत्रात ६४ टक्के म्हणजेत ३०९ वेळा पास करत फुटबॉल युक्रेनच्या ताब्यात होता. तर ३६ टक्के म्हणजे १७९ वेळा पास करत फुटबॉल नॉर्थ मसेडोनियाच्या ताब्यात होता. मैदानात गैरवर्तन केल्याप्रकरणी युक्रेनच्या एका खेळाडूला पिवळं कार्ड दाखवण्यात आलं.

युक्रेन आणि नॉर्थ मसेडोनिया हे संघ यापूर्वी मोठ्या स्पर्धेत दोनदा आमनेसामने आले होते. या दोन्ही सामन्यात युक्रेन वरचढ असल्याचं दिसून आलं आहे. घरच्या मैदानावर नॉर्थ मसेडोनियाचा १-० ने, तर युरो कप २०१६ च्या पात्रता फेरीत २-० ने पराभव केला होता. युक्रेन आणि नॉर्थ मसेडोनिया यांच्यात झालेल्या मागच्या चार सामन्यात एकूण ४ गोल झाले आहे. त्यापैकी ३ युक्रेनने आणि १ नॉर्थ मसेडोनियाने संघाने मारला आहे.