यूरो कप २०२० स्पर्धेतल्या साखळी फेरीतील सामन्यांचा दुसरा टप्पा सुरु असल्याने संघांमध्ये बाद फेरीत पोहोचण्याची चढाओढ सुरु झाली आहे. आज युक्रेन विरुद्ध नॉर्थ मसेडोनिया, डेन्मार्क विरुद्ध बेल्जियम आणि नेदरलँड विरुद्ध ऑस्ट्रिया या संघांमध्ये सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यांतर बाद फेरीतील चित्र जवळपास स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यांकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

युक्रेन विरुद्ध नॉर्थ मसेडोनिया

यूरो कप २०२० ‘क’ गटातील साखळी फेरीतील दुसरा सामना युक्रेन आणि नॉर्थ मसेडोनिया या संघात रंगणार आहे. नॉर्थ मसेडोनिया आणि युक्रेन या दोन्ही संघांना पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे स्पर्धेतील अस्तित्व कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकावा लागणार आहे. हा सामना बरोबरीत सुटला तर मात्र बाद फेरीत पोहोचण्याचं दोन्ही संघांचं स्वप्न कठीण होईल. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघाकडून आक्रमकपणा पाहायला मिळेल. युक्रेनला पहिल्या सामन्यात नेदरलँडकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. नेदरलँडने युक्रेनचा ३-२ पराभव केला होता. तर ऑस्ट्रियाने नॉर्थ मसेडोनियाला ३-१ ने पराभूत केलं होतं.

बेल्जियम विरुद्ध डेन्मार्क

‘ब’ गटातील साखळी फेरीत आज बेल्जियम आणि डेन्मार्क आमनेसामने असणार आहेत. या सामन्यात बेल्जियमचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे. बेल्जियमने पहिल्या सामन्यात रशियाला ३-० ने पराभूत केल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे या स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी डेन्मार्कच्या खेळाडूंना चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. डेन्मार्कला यापूर्वीच्या सामन्यात फिनलँडकडून १-० ने पराभव सहन करावा लागला होता. या सामन्यात एरिक्सन मैदानात कोसळल्याने डेन्मार्कच्या गोटात चिंतेचं वातावरण होतं. मात्र तो व्यवस्थित असल्याचं कळल्यानंतर सामना पुन्हा सुरु करण्यात आला. तेव्हा फिनलँडने आक्रमक खेळी करत १ गोलची आघाडी घेतली आणि विजय मिळवला.

नेदरलँड विरुद्ध ऑस्ट्रिया

यूरो कप २०२० ‘क’ गटातील साखळी फेरीतील तिसरा सामना नेदरलँड आणि ऑस्ट्रिया या संघात रंगणार आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेत विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. नेदरलँडने पहिल्या सामन्यात युक्रेनचा ३-२ ने पराभव केला होता. तर ऑस्ट्रियाने नॉर्थ मसेडोनियाचा ३-१ ने पराभव केला होता. त्यामुळे आजच्या सामन्यानंतर ‘क’ गटातील बाद फेरीचं चित्र स्पष्ट होणार आहे.

यूरो कप २०२०: इटलीची बाद फेरीत धडक; स्वित्झर्लंडला ३-० ने केलं पराभूत

सामने आणि वेळ

  • युक्रेन विरुद्ध नॉर्थ मसेडोनिया (संध्या. ६.३० वाजता)
  • डेन्मार्क विरुद्ध बेल्जियम ( रात्री ९.३० वाजता)
  • नेदरलँड विरुद्ध ऑस्ट्रिया (रात्री १२.३० वाजता)