यूरो कप २०२० स्पर्धेत वेल्सनं टर्कीवर विजय मिळवल्याने बाद फेरीत पोहोचण्याचा मार्ग सुकर झाला आहे. वेल्स आणि स्वित्झर्लंड सामना बरोबरीत सुटल्याने हा सामना वेल्ससाठी महत्त्वपूर्ण होता. या सामन्यावर बाद फेरीतील गणित अवलंबून होती. त्यामुळे वेल्सने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत टर्कीला २-० ने नमवलं. या स्पर्धेतील टर्कीचं आव्हान संपुष्टात आलं आहे. दोन सामन्यात पराभवासह एकही गोल झळकवता आला नाही. इटलीकडून ३-० ने पराभव मिळाल्यानंतर साखळी फेरीतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकणं टर्कीला महत्त्वाचं होतं. मात्र या सामन्यातही टर्कीच्या पदरी निराशाच पडली. वेल्सच्या आरोन रॅमसेने ४२ व्या मिनिटाला, तर रॉबर्ट्सने ९५ मिनिटाला गोल झळकावत संघाला २ गोलची आघाडी मिळवून दिली.

सामन्यात फुटबॉल जास्तीत जास्त वेळ ताब्यात ठेवण्यात टर्कीला यश आलं. मात्र त्याचं गोलमध्ये रुपांतर करण्यात अपयश आलं. टर्कीच्या खेळाडूंनी ५१४ वेळा फुटबॉल पास केला. तर वेल्सच्या खेळाडून ३०० वेळा फुटबॉल पास करत दोन गोल झळकावले. या विजयासह ‘अ’ गटातील गुणतालिकेत वेल्सचा संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. यामुळे वेल्सचं बाद फेरीत पोहोचण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या सामन्यात टर्की आणि वेल्सच्या प्रत्येकी दोन खेळाडूंना गैरवर्तन केल्याने पिवळं कार्ड दाखवण्यात आलं.

पहिल्या सत्रात वेल्स संघाने १ गोलने आघाडी घेतल्याने टर्कीवर दडपण आलं होतं. या सामन्यासाठी टर्की आणि वेल्सने ४-१-४-१ अशी व्यूहरचना आखली होती. वेल्सचा पुढचा सामना २० जून रोजी इटलीसोबत आहे. तर त्याच दिवशी टर्की स्वित्झर्लंडशी सामना करणार आहे. बाद फेरीतील सामने २६ जूनपासून खेळले जाणार आहेत.

संघातील खेळाडू

टर्कीः काकीर, सेलिक, सोय्यंकु, योकुस्लु, तुफान, अंडर, करमन, कॅल्हॅनोग्लू, मेरास, यिलमाझ (कर्णधार), आयहान

राखीव खेळाडू: गुनोक, बाइंदिर, डिमिरल, टोकॉक्स, याझिक्सी, अंतल्याली, कबाक, कोक्कू, कहवेसी, मुलदूर, डॅरिसोग्लू

वेल्स: वार्ड, सी रॉबर्ट्स, मेफॅम, रॉडन, बी डेव्हिस, एलन, मॉरेल, बेल ( कर्णधार), रॅमसे, जेम्स, मूर

राखीव खेळाडू: हेनेसी, ए. डेव्हीज, गुंटर, एन. विलियम्स, लॉकयर, विल्सन, टी. रॉबर्ट्स, अँपाडु, नॉरिंग्टन-डेव्हिस, जे. विलियम्स, ब्रूक्स, लेव्हिट्