News Flash

UEFA Euro Cup युरोपात सत्ता कुणाची?

UEFA Euro Cup फुटबॉल विश्वावर युरोप खंडातील संघांचे वर्चस्व असल्याचे सातत्याने पाहायला मिळते.

UEFA Euro Cup ११ जून ते ११ जुलै दरम्यान एकूण २४ संघांत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेला ‘फिफा’ विश्वचषकाप्रमाणेच महत्त्व आहे.


ऋषिकेश बामणे – response.lokprabha@expressindia.com

फुटबॉल विश्वावर युरोप खंडातील संघांचे वर्चस्व असल्याचे सातत्याने पाहायला मिळते. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेत यावेळी कोणता संघ बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

११ जून ते ११ जुलै दरम्यान एकूण २४ संघांत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेला ‘फिफा’ विश्वचषकाप्रमाणेच महत्त्व आहे. किंबहुना युरो चषक जिंकू शकणारा संघच फुटबॉल विश्वचषक जिंकू शकतो, असा समजही गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. २००८मध्ये युरो चषक जिंकणाऱ्या स्पेनने २०१०च्या ‘फिफा’ विश्वचषकावर नाव कोरले, हे याचेच उत्तम उदाहरण.

साधारणपणे दर चार वर्षांनी खेळली जाणारी ही स्पर्धा गतवर्षी होणे अपेक्षित होते. परंतु करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर क्रीडा क्षेत्र ठप्प पडल्यामुळे २०२१मध्ये युरो चषक खेळवण्याचे ठरवण्यात आले. त्यातच प्रेक्षकांनाही मर्यादित संख्येत स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या तणावापूर्ण वातावरणाच्या पाश्र्वभूमीवर किमान पुढील एक महिना तरी क्रीडाप्रेमींना फुटबॉलचा रोमांच अनुभवायला मिळणार आहे. त्या निमित्ताने युरो चषकाच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या निवडक संघांचा आढावा.

फ्रान्स
मुख्य आकर्षण : एन्गोलो कान्टे
सर्वोत्तम कामगिरी : विजेतेपद (१९८४, २०००)

फुटबॉलच्या प्रत्येक सामन्याचे जवळून निरीक्षण करणाऱ्या चाहत्याला यंदाचा युरो चषक कोण जिंकेल असे विचारले, तर त्याचे उत्तर फ्रान्स हेच असेल. किलियान एम्बाप्पे, अ‍ॅन्टोइन ग्रीझमन, पॉल पोग्बा, करीम बेन्झेमा अशा नामांकित खेळाडूंचा सहभाग असलेल्या फ्रान्सचा आधारस्तंभ मात्र मध्यरक्षक एन्गोलो कान्टे आहे. फुटबॉलमध्ये नेहमीच सर्वाधिक गोल करणारा खेळाडू प्रकाशझोतात येतो. परंतु कान्टेने यंदाच्या चॅम्पियन्स लीगमध्ये चेल्सीकडून खेळताना मध्यभागी राहूनही संघाला विजयी करता येते, हे दाखवून दिले. संपूर्ण मैदानाबाहेर कुठेही धाव घेत प्रतिस्पध्र्याला गोल करण्यापासून रोखण्याबरोबरच स्वत:च्या संघातील आक्रमणपटूंना गोल करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात कान्टे पटाईत आहे. २०१८च्या ‘फिफा’ विश्वचषक विजेत्या फ्रान्सच्या गटात जर्मनी, पोर्तुगाल यांसारख्या कडव्या संघांचा समावेश आहे.

बेल्जियम
मुख्य आकर्षण : रोमेलू लुकाकू
सर्वोत्तम कामगिरी : उपविजेतेपद (१९८०)

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या बेल्जियमच्या संघातही फ्रान्सप्रमाणेच एकापेक्षा एक प्रतिभावान खेळाडूंचा भरणा आहे. परंतु क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे दक्षिण आफ्रिकेचा संघ बाद फेरीतील लढतींमध्ये कच खातो, त्याचप्रमाणे बेल्जियमवरही ‘चोकर्स’ असा शिक्का बसला आहे. अनुभवी आक्रमणपटू रोमेलू लुकाकूवर यंदा बेल्जियमची मदार असेल. लुकाकूने इंटर मिलानला सेरी-ए लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याशिवाय केव्हिन डीब्रुएने, एडिन हॅझार्ड यांच्याकडूनही बेल्जियमला अपेक्षा आहेत. डेन्मार्क, रशिया, फिनलॅण्ड यांच्यासह ‘ब’ गटात समावेश असलेला बेल्जियम यंदा प्रथमच युरो चषकावर नाव कोरणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

पोर्तुगाल
मुख्य आकर्षण : ख्रिस्तियानो रोनाल्डो
सर्वोत्तम कामगिरी : विजेतेपद (२०१६)

विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालला यंदा जेतेपद कायम राखण्याची संधी आहे. २०१६मध्ये पोर्तुगालने अंतिम फेरीत फ्रान्सवर मात केली होती. क्लब पातळीवर युव्हेंटसकडून खेळताना यंदाच्या हंगामात रोनाल्डोला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. परंतु पोर्तुगालसाठी खेळताना तो सर्वस्व पणाला लावेल, यात शंका नाही. ३६ वर्षीय रोनाल्डोने पोर्तुगालसाठी सर्वाधिक १०६ गोल नोंदवले आहेत. बर्नाडो सिल्व्हा, दिएगो जोटा, ब्रुनो फर्नाडिस यांच्या समावेशामुळे पोर्तुगालचा संघ अधिक ताकदवान झाला आहे. ‘फ’ गटातील जर्मनी, फ्रान्स यांसारख्या कडव्या संघांना पोर्तुगाल कशी झुंज देतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

यांच्यावरही चाहत्यांची नजर

फ्रान्स, बेल्जियम, पोर्तुगाल आणि इंग्लंड या चार संघांव्यतिरिक्त स्पेन, इटली, जर्मनी, क्रोएशिया, टर्की आणि नेदरलॅण्ड्स या संघांवरही चाहत्यांची नजर असेल. जर्मनीला गेल्या विश्वचषकात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मात्र यंदा ते पुन्हा भरारी घेऊ शकतात. ल्युका मॉड्रिचच्या क्रोएशियाने धक्कादायक कामगिरी करताना विश्वचषकात थेट अंतिम फेरी गाठली. त्यामुळे यंदाही त्यांच्याकडून त्याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असेल. स्पेन, इटली या संघांना मोठय़ा स्पर्धामध्ये खेळ कसा उंचवावा, याचे कौशल्य अवगत आहे. त्यामुळे स्पर्धा रंगतदार होण्याची १०० टक्के खात्री आहे.

इंग्लंड
मुख्य आकर्षण : हॅरी केन
सर्वोत्तम कामगिरी : उपांत्य फेरी (१९६८, १९९६)

२०१८च्या फिफा विश्वचषकात इंग्लंडला ‘फेव्हरेट’ मानले जात होते. परंतु त्यांना विजेतेपद मिळवता आले नाही. यंदाही इंग्लंडला चाहत्यांची पसंती मिळत आहे. फिल फोडेन, मार्कस रशफोर्ड, रहीम स्टर्लिग या आघाडीवीरांमुळे त्यांची बाजू भक्कम आहे. मात्र अनुभवी हॅरी केनवर इंग्लंडची प्रामुख्याने मदार असेल. गेल्या विश्वचषकात केननेच ‘गोल्डन बूट’चा पुरस्कार मिळवला होता. गॅरेथ साऊथगेट यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणाऱ्या इंग्लंडची बचावफळीही सुधारली आहे. त्यामुळे यंदा प्रथमच युरो चषकाची अंतिम फेरी गाठण्याच्या निर्धाराने इंग्लंडचे खेळाडू मैदानात उतरतील. इंग्लंडला ‘ड’ गटात क्रोएशिया, स्कॉटलंड आणि चेक प्रजासत्ताक या संघांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 2:35 pm

Web Title: euro cup 2021 best football players and teams dd 70
टॅग : Euro Cup 2020
Next Stories
1 WTC Final: विराटच्या डोकेदुखीवर हरभजनाचा रामबाण उपाय!; म्हणाला…
2 फुटबॉलच्या मैदानातही राजकीय वाद!; युरो कपआधीच ‘त्या’ घोषणेवरुन रशिया-युक्रेन आमनेसामने
3 UEFA Euro Cup स्पर्धेसाठी गुगलचं खास डुडल!
Just Now!
X