गेल्या महिन्याभरापासून २४ संघांत झालेल्या थरारक जुगलबंदीनंतर अखेर रविवारी युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या पटलावर विजेत्याचा उदय होईल. चाहत्यांचा विश्वास सार्थ ठरवून स्वप्नवत कामगिरीच्या बळावर आगेकूच करणारा इंग्लंड आणि गेल्या दोन वर्षांपासून मुक्तशैलीच्या खेळाद्वारे प्रतिस्पध्र्यांवर वर्चस्व गाजवणारा इटली हे दोन संघ रविवारी वेम्बले स्टेडियमवर वर्चस्वासाठी झुंजतील, तेव्हा अवघ्या क्रीडाविश्वाचे लक्ष आपसूकच त्यांच्याकडे वेधले जाईल.

फुटबॉलमध्ये ‘फिफा’ विश्वचषकानंतर युरो चषकाला सर्वाधिक प्रतिष्ठेचे स्थान दिले जाते. युरोपियन देशांच्या फुटबॉलमधील वाढत्या मक्तेदारीमागे युरो चषकाचा मोलाचा वाटा आहे.  गॅरेथ साऊथगेट यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा इंग्लंडचा संघ यंदा पहिल्यावहिल्या युरो चषकावर नाव कोरण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल. स्पर्धेत फक्त एकच गोल स्वीकारणाऱ्या इंग्लंडला रोखणे कठीण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

त्याच वेळी रॉबर्टो मान्चिनी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा संघ दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याच्या निर्धाराने खेळतील. स्पर्धेतील सर्व सामने जिंकणारा इटलीचा संघ सांघिक कामगिरीद्वारे इंग्लंडवर वरचढ ठरू शकतो, परंतु त्यांना अंतिम फेरीत इंग्लंडच्या ११ खेळाडूंसह त्यांच्या चाहत्यांचाही सामना करावा लागेल. त्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांवर काही दिवसांपासून रंगलेल्या ‘इट्स गोइंग रोम ओर इट्स कमिंग होम’ या द्वंद्वाचे उत्तर मिळवण्यासाठी तमाम चाहते उत्सुक आहेत.

इटलीचा संघ चौथ्यांदा, तर इंग्लंड प्रथमच युरो चषकाच्या अंतिम फेरीत खेळत आहे. यापूर्वी इटलीने १९६८ मध्ये ही स्पर्धा जिंकली असून, २००० आणि २०१२ मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

बलस्थाने : इंग्लंडसाठी स्पर्धेत सर्वाधिक चार गोल करणारा कर्णधार हॅरी केन आणि रहीम स्टर्लिंग (३ गोल) यांच्याकडून संघाला पुन्हा एकदा दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. ल्युक शॉ मध्यरक्षकाची भूमिका अप्रतिमपणे बजावत असून गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्डने आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेत एकच गोल स्वीकारला आहे.

कच्चे दुवे : बचाव फळीत कलात्मकरीत्या पासेस पुरवण्याचा अभाव आहे. त्यामुळे चेंडूवर अधिक काळासाठी ताबा राखण्यात इंग्लंडला अपयश येत असल्याचे डेन्मार्कविरुद्ध दिसून आले. फिल फोडेन या सामन्याला मुकण्याची शक्यता असून केन-स्टर्लिंगभोवती बचावपटूंचा सापळा रचल्यास इंग्लंडचा पराभव अटळ आहे.

बलस्थाने : इटलीच्या आक्रमणाची धुरा कोणत्याही एका खेळाडूवर नाही. लॉरेन्झो इन्सिनिया, फेडरिको किएसा, मॅन्युएल लोकाटेली आणि सिरो इममोबिले या चौघांनीही स्पर्धेत प्रत्येकी दोन गोल नोंदवले आहेत. कर्णधार जार्जिओ चेलिनी आणि लिओनार्डो बोनुची हे अनुभवी बचावपटू इटलीची खरी ताकद आहे.

कच्चे दुवे : स्पेनविरुद्धच्या लढतीत इटलीच्या खेळाडूंची गती निर्धारित वेळेच्या आसपास फारच कमी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे इंग्लंडही याकडे लक्ष देऊन लाभ उचलू शकते. प्रामुख्याने बचावावर भर देण्याकडे इटलीचा अधिक कल असल्याने मधल्या आणि आक्रमक फळीवर इंग्लंडला दडपण टाकता येऊ शकते.

संभाव्य संघ

इंग्लंड (४-३-३) : जॉर्डन पिकफोर्ड (गोलरक्षक), कायले वॉकर, ल्युक शॉ, हॅरी मॅग्वायर, जॉन स्टोन्स, डीक्लॅन राइस, कॅल्व्हिन फिलिप्स, मसोन माऊंट, बुकायो साका, हॅरी केन, रहीम स्टर्लिंग.

इटली (४-३-३) : जिआनलुगी डोनारुमा (गोलरक्षक), जॉर्जिओ चेलिनी, लिओनार्डो बोनुची, जिओवानी डी लॉरेन्झो, निकोलो बॅरेला, जॉर्जिन्हो, मार्को व्हेराटी, लॉरेन्झो इन्सिनिया, मॅन्युएल लोकाटेली, फेडरिको किएसा, सिरो इममोबिल.

इटलीच्या संघाची ताकद आम्हाला माहीत आहे, परंतु युरो चषक उंचावण्याची संधी वारंवार मिळत नाही. आमचे खेळाडू मानसिकदृष्ट्या या आव्हानासाठी तयार असल्यामुळे यंदा आम्हीच युरोपावर वर्चस्व गाजवू. – हॅरी केन, इंग्लंडचा कर्णधार

२०१८च्या विश्वचषकातील नामुष्कीनंतर संघाने ज्या प्रकारे भरारी घेतली आहे, ते कौतुकास्पद आहे. इंग्लंडला त्यांच्याच मैदानात धूळ चारून जेतेपद पटकावण्याचा आनंद निराळाच असेल.             – जॉर्जिओ चेलिनी, इटलीचा कर्णधार

१९९६च्या युरो चषकात मला पेनल्टीवर गोल करण्यात अपयश आल्याने इंग्लंडला अंतिम फेरी गाठता आली नाही. ती खंत मला आजही सलते. परंतु आताचा इंग्लंड संघ मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावण्यात पटाईत आहे. त्यांना पराभवाचे दु:ख पचवणे किती कठीण असते, हे ठाऊक आहे. त्यामुळे यंदा युरो चषक आमचाच असेल. – गॅरेथ साऊथगेट, इंग्लंडचे प्रशिक्षक

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या सामन्याचीच तयारी करत आहोत. कोणतेही दडपण न घेता आतापर्यंत ज्या प्रकारे सांघिक कामगिरी केली, त्याचीच पुनरावृत्ती अंतिम लढतीतही पाहायला मिळेल. मात्र अंतिम सामन्याचा निकाल काहीही लागला, तरी या संघाच्या घोडदौडीचा मला कायम अभिमान असेल. – रॉबर्टो मान्चिनी, इटलीचे प्रशिक्षक