युरोपा लीग फुटबॉल :- युवा खेळाडू मसोन ग्रीनवूड याच्या सुरेख कामगिरीमुळे मँचेस्टर युनायटेडने पार्टिझन बेलग्रेड संघाचा ३-० असा पराभव करून युरोपा फुटबॉल लीगच्या अंतिम ३२ जणांमध्ये धडक मारली आहे. सेल्टिक एफसीने शेवटच्या मिनिटाला गोल करत लॅझियोला नमवून आगेकूच केली आहे.

ओले गनर सोलस्कायर यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळणाऱ्या मँचेस्टर युनायटेडने एल गटात गेल्या चार सामन्यांत तिसरा विजय मिळवत आगेकूच केली आहे. १८ वर्षीय ग्रीनवूडने २२व्या मिनिटाला गोलशून्यची कोंडी फोडली. त्याचा हा या मोसमातील तिसरा तर या स्पर्धेतील दुसरा गोल ठरला. अँथोनी मार्शलने ३३व्या मिनिटाला दुसरा गोल करत मँचेस्टर युनायटेडला आघाडीवर आणले. मध्यंतरानंतर चार मिनिटांनी मार्कस रॅशफोर्डने अप्रतिम गोल करत मँचेस्टर युनायटेडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

‘‘आम्ही चांगली कामगिरी केली असली तरी त्यात अद्यापही सुधारणा होण्याची गरज आहे. तीनपेक्षा अधिक गोल झळकावण्याची संधी आम्हाला होती,’’ असे रॅशफोर्डने सांगितले. याच गटात अझ अल्कमारने अस्तानाचा ५-० असा धुव्वा उडवून दुसरे स्थान प्राप्त केले आहे.

सेल्टिक एफसीने लॅझियोचा २-१ असा पाडाव करून ई गटात १० गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. सिरो इमोबाइलने सातव्या मिनिटालाच लॅझियोला आघाडीवर आणले होते. पण जेम्स फॉरेस्टच्या (३८व्या मिनिटाला) गोलमुळे सेल्टिकने या सामन्यात पुनरागमन केले. त्यानंतर अतिरिक्त वेळेत सामना संपायला काही सेकंद शिल्लक असताना ऑलिव्हियर नचॅमने  शानदार गोल रचून सेल्टिक एफसीला निसटता विजय मिळवून दिला.