News Flash

युरोपियन वर्चस्वासाठी २४ संघांत जुगलबंदी!

गेल्या जवळपास दीड वर्षांपासून युरोप खंडातील बहुतांश देशांना करोनाविरुद्ध लढा द्यावा लागला.

इटलीचे खेळाडू सराव करताना.

इटली आणि टर्की यांच्यात आज सलामीची लढत

एपी, रोम

गेल्या जवळपास दीड वर्षांपासून युरोप खंडातील बहुतांश देशांना करोनाविरुद्ध लढा द्यावा लागला. मात्र आता सर्व नकारात्मक बाबींना मागे सारून अवघे युरोप पुढील एक महिना करोनावर मात केल्याच्या आवेशात फुटबॉलच्या रंगात रंगून जाईल. प्रतिष्ठित युरो चषक फुटबॉल स्पर्धेला शुक्रवार मध्यरात्रीपासून प्रारंभ होणार असून सलामीच्या लढतीत इटली आणि टर्की एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत.

दर चार वर्षांनी खेळवण्यात येणारी ही स्पर्धा कार्यक्रम पत्रिकेनुसार गतवर्षीच व्हायला हवी होती; परंतु करोनामुळे २०२१मध्ये युरो चषकाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासूनच चाहत्यांना या स्पर्धेची उत्सुकता लागली आहे. २०१६मध्ये झालेल्या अखेरच्या युरो चषकात ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालने विजेतेपद मिळवले होते.

रोम येथे होणाऱ्या ‘अ’ गटातील सलामीच्या सामन्यासाठी इटलीचे पारडे जड मानले जात आहे. रॉबेतरे मॅन्चिनी यांच्या मार्गदर्शनाखालील इटलीला २०१८च्या विश्वचषकासाठी पात्र ठरण्यात अपयश आले. परंतु युरो चषकाच्या पात्रता फेरीत त्यांनी सर्वाधिक १० सामने जिंकून आपले इरादे स्पष्ट केले. गेल्या आठ लढतींत इटलीविरुद्ध प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करता आलेला नाही. मार्को व्हेराटी, फेड्रिको चीसा, आंद्रे बेलोटी यांच्यावर इटलीची मदार आहे.

टर्कीकडे यंदाच्या स्पर्धेतील सर्वाधिक धोकादायक संघ म्हणून पाहिले जाते. टर्कीकडून सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या बुराक यिलमाझवर संघाची सर्वाधिक भिस्त असेल. त्यांची बचावफळीही उत्तम लयीत असून पात्रता स्पर्धेत त्यांनी फक्त तीन गोल स्वीकारले आहेत. त्यामुळे त्यांच्या बचावफळीपासून इटलीला सावध राहावे लागेल.

प्रेक्षकांना परवानगी!

शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेसाठी प्रेक्षकांना मर्यादित संख्येत प्रवेश देण्यात येणार असल्याचे युरोपियन फुटबॉल महासंघाने जाहीर केले. ११ शहरांत आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक शहरातील करोनाची स्थिती आणि स्टेडियमच्या एकूण प्रेक्षक क्षमतेचा आढावा घेऊन चाहत्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. बुडापेस्ट येथेच फक्त १०० टक्के प्रेक्षकांना परवानगी असून म्युनिक येथे सर्वाधिक कमी म्हणजेच २२ टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाईल.

११ इटली आणि टर्की यांच्यात ११ आंतरराष्ट्रीय सामने झाले असून इटलीने आठ लढती जिंकल्या आहेत. तीन सामने बरोबरीत सुटले आहेत.

२७इटलीचा संघ गेल्या २७ सामन्यांपासून अपराजित आहे, तर टर्कीला युरो चषकात आतापर्यंत चार वेळा सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला आहे.

इटली वि. टर्की

९  स्थळ : स्टॅडिओ ऑलिम्पिको

९  वेळ : मध्यरात्री १२.३० वा.

९  थेट प्रक्षेपण : सोनी टेन २, सोनी टेन ३ (हिंदी) आणि एचडी वाहिन्या

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 1:05 am

Web Title: european football itali turkey euro 2020 corona ssh 93
Next Stories
1 पाव्हल्यूचेन्कोव्हा प्रथमच अंतिम फेरीत
2 श्रीलंका दौऱ्यासाठी धवनकडे नेतृत्व; ऋतुराजला संधी
3 नेयमार, सिल्व्हा यांचा ब्राझील संघात समावेश
Just Now!
X