एव्हर्टनने सामना बरोबरीत सोडवला
रोमेलू लुकाकूने पॅलेसविरुद्ध गोल्सचे अर्धशतकही पूर्ण केले. एव्हर्टनकडून १०० सामन्यांतील त्याचा हा पन्नासावा गोल ठरला.
न्यू कॅसल युनायटेड (१-५) क्लबवरील दणदणीत विजयाच्या आनंदात लिव्हरपूलमध्ये दाखल झालेल्या क्रिस्टल पॅलेस क्लबच्या मार्गात एव्हर्टनच्या रोमेलू लुकाकूने खोडा घातला. इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पध्रेतील या लढतीत लुकाकूने ८१व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे एव्हर्टनने सामना १-१ अशा बरोबरीत सोडवला. गुडिसन पार्क येथे मंगळवारी झालेल्या सामन्यात स्कॉट डॅनने पॅलेससाठी गोल केला.
लिव्हरपूलच्या या स्टेडियमवरील गतसामन्यात यजमानांवर विजय साजरा करणाऱ्या पॅलेसला या बरोबरीमुळे एका गुणावर समाधान मानावे लागले आहे. एव्हर्टनने आक्रमक रणनीतीने पॅलेसवर हल्लाबोल केला. गोल करण्याच्या संधी ते वारंवार निर्माण करीत होते, परंतु यश त्यांच्या पदरी पडेना. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. लुकाकूने दुसरे सत्र गाजवले. त्याने जवळपास ३ ते ४ गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या, परंतु थोडय़ा फरकाने यश त्याला हुलकावणी देत होते. दुसरीकडे एव्हर्टनच्या रणनीतीचा अभ्यास करून पॅलेस हळूहळू सामन्यावर पकड निर्माण करू लागला होता. ७६ व्या मिनिटाला त्याचे फळ त्यांना मिळाले. जेसन पुंचीयॉनने कॉर्नरवरून टोलवलेल्या चेंडूवर स्कॉट डॅनने गोल करून पॅलेसला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र अवघ्या पाच मिनिटांत लुकाकूने गेरार्ड लॅझरोच्या पासवर गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. निर्धारित हीच बरोबरी कायम राहिली. एव्हर्टन १५ सामन्यांत २२ गुणांसह ९व्या स्थानावर विराजमान असून पॅलेसने २३ गुणांसह एक स्थान झेप घेत सहावा क्रमांक गाठला आहे. ३२ गुणांसह लेईस्टर अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ आर्सेनल (३०), मँचेस्टर सिटी (२९) यांचा क्रमांक लागतो.

मला अभिमान वाटतो, परंतु मी सांघिक कामगिरीवर विश्वास ठेवतो. तीन गुण मिळवण्यात अपयश आले, याचे दु:ख वाटते.
– रोमेलू लुकाकू