रणजी करंडक स्पर्धेत कर्नाटक विरुद्ध बडोदा यांच्यातील सामन्यात, समालोचकांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. खेळ सुरु असताना हिंदी समालोचन करणाऱ्या व्यक्तीने प्रत्येक भारतीयाला हिंदी आलीच पाहिजे, हिंदी ही आपली मातृभाषा आहे असं वक्तव्य केलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

व्हिडीओमध्ये एक समालोचक सुनील गावसकर हे सध्या हिंदी समालोचनाकडे वळले आहेत, आणि हिंदी भाषेमध्ये ते कसे नवीन शब्द प्रचलात आणत आहेत याबद्दल बोलत होते. यावेळी सुशील दोशी या समालोचकाने, प्रत्येक भारतीयाला हिंदी भाषा आलीच पाहिजे, ही आपली मातृभाषा आहे. याव्यतिरीक्त कोणतीही भाषा मोठी नाही, असं वक्तव्य केलं.

२०११ साली झालेल्या जनगणनेनुसार, भारतात ४३ टक्के लोकं हिंदी भाषा बोलतात. (यामध्येही भोजपुरी, राजस्थानी यासारख्या अनेक बोली भाषांचाही समावेश आहे) हिंदी ही भारताची मातृभाषा असल्याला कोणताही पुरावा नाही. त्यामुळे समालोचनाच्या माध्यमातून हिंदी भाषा थोपवण्याचं काम करणं अतिशय चुकीचं असल्याचं मतही नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे आगामी काळात बीसीसीआय याप्रकरणी नेमकं काय पाऊल उचलतं हे पहावं लागणार आहे.