मालिका जिंकायची असेल तर संघातील प्रत्येकाने योगदान द्यायला हवे. प्रत्येकाने सर्वोत्तम कामगिरी केली तरच संघाला विजय मिळू शकतो, असे उद्गार इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने काढले. कुकने १७६ धावांची झुंजार खेळी करीत इंग्लंडचा डावाने पराभव टाळला. मात्र मॅट प्रॉयर वगळता अन्य फलंदाजांची साथ न लाभल्याने इंग्लंडला मोठय़ा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.
 ‘‘एक संघ म्हणून आम्हाला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर कामगिरीत सुधारणा करायला लागेल. नऊ विकेट्स राखून हरणे हा मोठा पराभव आहे. ही कसोटी वाचवण्याची आम्हाला संधी कमी होती पण पाचव्या दिवशी आम्हाला डावपेचाप्रमाणे खेळ करता आला नाही. वैयक्तिक शतकाने जरूर आनंद झाला, परंतु सामना वाचवला असता तर अधिक आनंद झाला असता,’’ असे त्याने सांगितले.