26 February 2021

News Flash

चॅपल एकटे दोषी नाहीत, मला कर्णधार पदावरुन हटवण्यात सर्वांचा सहभाग – सौरव गांगुली

बंगाली वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मांडलं मत

भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष अशा स्वप्नवत प्रवास सौरव गांगुलीने पूर्ण केला आहे. काही दिवसांपूर्वीच सौरवने आपला वाढदिवस साजरा केला. भारतीय संघाचा कर्णधार असताना प्रशिक्षक ग्रेग चॅपल आणि गांगुली यांच्यातले मतभेद आणि अचानक कर्णधारपदावरुन दादाची हकालपट्टी हा घटनाक्रम सर्वांना माहिती असेलच. आपल्या वाढदिवशी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना बहुचर्चित वादावर आपलं मत मांडलं.

“माझ्या आयुष्यातला तो सर्वात मोठा धक्का होता. कर्णधारपद काढून घेणं हा माझ्यावरचा अन्याय होता. प्रत्येक वेळी तुम्हाला न्याय मिळेल अशी मलाही अपेक्षा नव्हती, पण ज्या पद्धतीने मला वागवण्यात आलं ते टाळता आलं असतं. मी संघाचा कर्णधार होतो, झिम्बाब्वे दौरा जिंकून आम्ही आलो आणि अचानक मला कर्णधारपदावरुन काढण्यात आलं. भारतासाठी २००७ सालचा विश्वचषक जिंकण्याचं माझं स्वप्न होतं. त्याआधीच्या स्पर्धेत आम्ही अंतिम फेरीत हरलो होतो. स्वप्न पाहण्याचा मलाही अधिकार होता. माझ्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ५ वर्ष घरच्या मैदानावर आणि परदेशात चांगली कामगिरी करत होता, आणि अचानक मला संघातून काढलं जातं?? पहिल्यांदा सांगण्यात आलं की मी वन-डे संघाचा सदस्य नाहीये…त्यानंतर कसोटी संघातूनही मला डावलण्यात आलं.” एका बंगाली वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत गांगुलीने आपली प्रतिक्रिया दिली.

“प्रशिक्षक ग्रेग चॅपल आणि बीसीसीआय यांच्यातले इ-मेल लिक झाल्यानंतरच या सर्व प्रकरणाला सुरुवात झाली. मला ग्रेग चॅपल यांना एकट्याला दोषी धरायचं नाहीये. त्यांनी या सर्व प्रकरणाला सुरुवात केली यात काही शंकाच नाही. माझ्याविरोधात त्यांनी अचानक बोर्डाला इ-मेल पाठवला. क्रिकेट संघ हा एक परिवारासारखा असतो. अनेकांची वेगळी मतं असणारच, चर्चेने त्यावर मार्ग काढता येतो. तुम्ही संघाचे प्रशिक्षक आहात, तुम्हाला असं वाटत असेल की माझा खेळ बरोबर होत नाहीये, मी वेगळ्या पद्धतीने खेळायला हवं तर तुम्ही मला तसं येऊन सांगणं गरजेचं आहे. खेळाडू म्हणून मी संघात पुनरागमन केलं त्यावेळी चॅपल मला ही गोष्ट सांगायचे, मग कर्णधार असताना त्यांनी असं का केलं नाही??”

चॅपल यात जितके दोषी आहेत तितकेच इतरही. एक परदेशी प्रशिक्षक भारतीय संघाच्या निवडीबद्दल एवढी महत्वाची भूमिका बजावू शकत नाही. संपूर्ण सिस्टीम माझ्याविरोधात असल्याशिवाय हे शक्य होणार नव्हतं. मला कर्णधारपदावरुन हटवण्यात सर्वांचा सहभाग होता. पण या काळात मी खचलो नाही, स्वतःवरचा विश्वास कमी होऊ दिला नाही, गांगुलीने जुन्या कटू आठवणी जागवल्या. २००५ साली भारतीय संघातून स्थान गमावल्यानंतर गांगुलीने २००६ साली संघात पुन्हा पुनरागमन केलं. दोन वर्षांच्या काळात आश्वासक खेळ करत २००८ साली गांगुली ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर कसोटी सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 5:01 pm

Web Title: everyone was involved sourav ganguly reveals how he was dropped from indian team psd 91
Next Stories
1 आम्ही प्रयत्न केला पण…२०१९ विश्वचषकातील ‘त्या’ पराभवावर व्यक्त झाला रविंद्र जाडेजा
2 वाढदिवशी सुनिल गावसकरांना MCA ने दिलं मोठं गिफ्ट
3 दुधात पडलेली माशी बाहेर काढतात तसं अजिंक्यला वन-डे संघातून बाहेर काढलं !
Just Now!
X