आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदकाचा वेध घेत १६ वर्षीय सौरभ चौधरीने भारताला नेमबाजीतलं पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. पहिल्यांदाच आशियाई खेळामध्ये सहभागी झालेल्या सौरभने अंतिम फेरीत जपानच्या टी. मस्तुदाला मागे टाकत भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली.

सौरभच्या या सोनेरी कामगिरीनंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. पण सुवर्ण पदक जिंकण्याची सौरभची पहिलीच वेळ नाही याच वर्षी जुलैमध्ये जर्मनीत जालेल्या आईएसएसएफ ज्यूनियर विश्वचषक स्पर्धेत विश्वविक्रमी कामगिरी करत सुर्वण पदक जिंकले होते. जाणून घेऊयात सौरभचा आतापर्यंतचा प्रवास आणि त्याच्याबद्दलच्या इतर खास गोष्टी…

>
सौरभचा जन्म मेरठमधील कलिना या गावी ११ मे २००२ साली झाला.

>
त्याने तीन वर्षापूर्वी म्हणजेच वयाच्या १३व्या वर्षी छंद म्हणून नेमाबाजी करण्यास सुरुवात केली.

>
बिनौल येथील बाबा शामल शुटिंग अकॅडमीमध्ये सौरभने नेमाबाजीचे प्रशिक्षण घेतले.

>
सौरभ पहिल्यांदाच आशियाई खेळांमध्ये सहभागी झाला आहे. मागील वर्षभरामध्ये सौरभच्या कामगिरीमध्ये सातत्याने सुधारणा होताना दिसत आहे. राष्ट्रीय स्तरावरील कामगिरीबरोबरच सौरभने आंतरराष्ट्रीय ज्युनियर स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवला आहे.

>
डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या १०व्या आशियाई युथ ऑलिम्पिक पात्रता क्रिडा स्पर्धांमध्ये सौरभने चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत विश्वविक्रम करत सौरभने सुवर्ण पदक जिंकले. २०१८ युवा क्रीडा स्पर्धेसाठी स्थान मिळवणारा सौरभ हा तिसरा भारतीय ठरला.

>
२०१७ साली झालेल्या केएसएस शुटिंग चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वयाच्या १५ व्या वर्षी सौरभने १० मी. एअर पिस्तुल प्रकारात जितू रॉयला मागे टाकत सुवर्ण पदक जिंकले. त्याच दिवशी त्याने ज्युनियर स्पर्धांमध्ये रौप्य पदकही जिंकले होते.

>
२०१७ च्या वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशीप स्पर्धेत तो भारतीय नेमबाजी संघाचा सदस्य होता. या संघाने कांस्य पदक पटकावलं होतं.

>
याच वर्षी जुलैमध्ये जर्मनीत जालेल्या २०१८ आईएसएसएफ ज्यूनियर विश्वचषक स्पर्धेत विश्वविक्रमी कामगिरी करत सौरभने सुर्वण पदक जिंकले होते. अंतिम फेरीमध्ये सौरभने २४३.७ गुणांची कमाई करत चीनच्या वांग झेहीओचा २४२.५ गुणांचा विश्वविक्रम मोडीत काढला होता.

>
या स्पर्धेनंतर जुलैमध्येच चेक प्रजासत्ताक येथील प्लाझीन येथे पार पडलेल्या २८व्या होप्स अंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीप स्पर्धेत पुरुषांच्या ज्युनियर गटामध्ये एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले होते तर मिश्र दुहेरीमध्ये देवांशी राणासोबत रौप्य पदक पटकावले होते.

>
आज झालेल्या १० मी एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पदक पटकावण्याआधी झालेल्या पात्रता फेरीतही सौरभ चौधरीने अव्वल स्थान पटकावलं होतं.