फुटबॉल नियंत्रित करणाऱ्या फिफा संघटनेतील महाघोटाळ्यात सहभागी झालेल्या व्यक्तींवरील कारवाईची मालिका सुरूच आहे. फिफाचे माजी सरचिटणीस जेरोम व्हाल्के यांच्यावर फुटबॉल संदर्भातील कोणत्याही कामकाजातील सहभागावर १२ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. फिफाच्या आचारसंहिता समितीने हा निर्णय जाहीर केला.
वैयक्तिक उपयोगासाठी खासगी विमानाचा वापर, पुरावे नष्ट करणे तसेच २०१८ आणि २०२२च्या विश्वचषक प्रक्षेपण हक्कांच्या विक्रीबाबत गैरव्यवहार अशा गंभीर आरोपांसाठी व्हाल्के यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे असे समितीने स्पष्ट केले. व्हाल्के यांनी फिफाच्या हिताविरोधात काम केले. फिफाचे अर्थकारण धोक्यात येईल अशी कृती केली. त्यांच्या वैयक्तिक आणि खासगी हितसंबंधांमुळे संघटनेचे कामकाज ते व्यावसायिक पद्धतीने करू शकले नाहीत. यामुळेच त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
संघटनेच्या पैशाचा विनियोग त्यांनी वैयक्तिक पर्यटनासाठी केला. संघटनेचे कोणतेही काम नसताना त्यांनी वैयक्तिक विमानाचा वापर केला. २०१८ आणि २०२२च्या विश्वचषकासाठीचे प्रक्षेपण हक्क बाजारभावापेक्षा खूप कमी किमतीत त्यांनी तटस्थ कंपनीला विकले.