२०१४ सालच्या इंग्लंड दौऱयात मॅन्चेस्टर कसोटीत भारतीय संघाचा दारुण पराभव वादाच्या भोवऱयात सापडला आहे. इंग्लंडविरुद्धचा हा सामना फिक्स होता, टीम इंडियाच्या मीटिंगमध्ये ठरलं वेगळचं होतं आणि त्याने मैदानावर वेगळाच निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट भारतीय संघाचे माजी व्यवस्थापक सुनील देव यांनी एका स्टिंग ऑपरेशनमधून केला आहे.

दिल्लीतील एका इंग्रजी वृत्तपत्राने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सुनील देव यांनी धोनीने ही कसोटी आधीच फिक्स केल्याचा आरोप केला. पण या वृत्तपत्राने हे स्टिंग ऑपरेशन जारी करताच सुनील देव यांनी घुमजाव केले आहे. याशिवाय, संबंधित वृत्तपत्राला कोर्टात खेचणार असल्याचाही दावा केला आहे.

दोन वर्षांपूर्वी इंग्लंड दौऱयावर गेलेल्या भारतीय संघाने यजमानांविरुद्धची कसोटी मालिका ३-१ अशी गमावली होती. लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱया कसोटीत भारताने ऐतिहासिक विजय साजरा केला होता. मात्र, पुढच्या तीन कसोटीत भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर धोनीच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मॅन्चेस्टरच्या चौथ्या कसोटीत पावसाळी वातावरण असतानाही फलंदाजीचा निर्णय घेतल्याने धोनी वादाच्या भोवऱयात सापडला होता. या कसोटीआधी संघाची जी बैठक झाली होती, त्यात नाणेफेक जिंकल्यास क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्याचे ठरले होते. मात्र, धोनीने नाणेफेक जिंकून अचानक फलंदाजी स्वीकारल्याने सर्व आश्चर्यचकीत झाले होते, असे सुनील देव यांनी स्टिंगमध्ये नमूद केले आहे.