प्रो-कबड्डीत यशस्वी संघांपैकी एक मानला जाणाऱ्या यू मुम्बाचे प्रशिक्षक एदुचरी भास्करन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नवीन हंगामात भास्करन तामिळ थलायवाज या संघाला प्रशिक्षण देणार आहेत. भास्करन यांच्या नेतृत्वाखाली यू मुम्बाने दुसऱ्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं होतं. तर पहिल्या तीन हंगामाची अंतिम फेरी गाठणारा यू मुम्बा हा एकमेव संघ ठरला होता. मात्र चौथ्या आणि पाचव्या हंगामात घसरलेल्या कामगिरीमुळे सहाव्या हंगामात संघ प्रशासनाने नव्याने संघ बांधणीचा निर्णय घेतला आहे. यासाठी यू मुम्बाने कोणत्याही खेळाडूला आपल्या संघात कायम राखलेलं नाहीये.

तब्बल २० वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव असलेल्या एदुचरी भास्करन यांनी गेल्या ४ वर्षांच्या कालावधीत यू मुम्बाच्या संघाची मोट बांधली होती. नवीन हंगामात तामिळनाडूच्या प्रशिक्षकपदाची सुत्र स्विकारल्यानंतर, भास्करन यांनी आपण नव्याने सुरुवात करण्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलं आहे. मागच्या हंगामात अजय ठाकूरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या तामिळ थलायवाजला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती, मात्र आता नवीन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तामिळ थलायवाजचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.