मुंबई : भारतीय बॅडमिंटनपटूंची कामगिरी वर्षांनुवर्षे उंचावत असून २०२०मध्ये होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारत बॅडमिंटनमध्ये पहिल्यावहिल्या ऐतिहासिक सुवर्णपदकावर नाव कोरेल, असा आशावाद राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी सोमवारी व्यक्त केला.

युवा खेळाडूंचा शोध घेणाऱ्या ‘यंग चॅम्प्स’ कार्यक्रमासाठी मुंबईत उपस्थित असलेल्या गोपीचंद यांनी भारतीय बॅडमिंटनपटूंच्या सध्याच्या कामगिरीविषयी आपली मते मांडली. ते म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांत देशातील बॅडमिंटनपटूंनी सर्वच स्पर्धामध्ये उल्लेखनीय प्रदर्शन केले आहे. २००८मध्ये बीजिंग ऑलिम्पिकला आपण उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहचलो. २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवालने भारताला कांस्यपदक मिळवून दिले, तर २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूने ऐतिहासिक रौप्यपदकाला गवसणी घातली. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आपण पहिलेवहिले सुवर्णपदक पटकावू, अशी आशा आहे.’’

‘‘पूर्वी बॅडमिंटन फक्त पुरुष एकेरीसाठी ओळखले जायचे. नंदू नाटेकर, सुरेश गोएल आणि प्रकाश पदुकोण यांसारखे प्रतिभावान पुरुष खेळाडू भारताचे आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व करायचे, मात्र सायनाने ही प्रथा बदलली. गेली ७-८ वर्षे तिने भारतीय बॅडमिंटनमध्ये महिलांचे अढळ स्थान निर्माण केले. मग पुढे सिंधूनेही हा वारसा पुढे चालू ठेवला,’’ असे गोपीचंद यांनी सांगितले.