आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय महिला संघाला आता बक्षिसांच्या वर्षांवापाठोपाठ भरघोस प्रायोजकही मिळण्याची अपेक्षा वाटू लागली आहे.

भारतीय संघातील १५ खेळाडूंपैकी १० खेळाडू रेल्वे खात्यात नोकरी करीत असल्यामुळे त्यांना अर्थार्जनाची हमी आहे. मात्र पुरुष खेळाडूंप्रमाणेच त्यांनाही पुरस्कृत व सदिच्छादूत करण्यासाठी कॉपरेरेट कंपन्या पुढे येतील अशी आशा वाटू लागली आहे. या संघाची कर्णधार मिताली राजला यापूर्वीच एका क्रीडा व्यवस्थापन कंपनीने करारबद्ध केले असून, त्याद्वारे तिला विविध कंपन्यांचे प्रायोजकत्व मिळत आहे. अन्य एक-दोन खेळाडूंना तीन-चार प्रायोजक यापूर्वी मिळाले आहेत. या संघातील सर्व खेळाडूंची लोकप्रियता घराघरांत पोहोचली असली तरी अद्याप फारसे प्रायोजक त्यांना मिळालेले नाहीत.

अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माला क्रिकेट साहित्यासाठी प्रायोजक मिळाला आहे. ती म्हणाली, ‘‘माझे वडील रेल्वे खात्यातून निवृत्त झाले असल्यामुळे मला त्यांच्या जागी नोकरी मिळेल. संघातील उर्वरित खेळाडूंनाही रेल्वे खात्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे. बक्षिसांच्या वर्षांवापेक्षाही तीन-चार वर्षांकरिता पुरस्कर्ते मिळाले तर आमची चिंता दूर होईल.’’

सलामीची  फलंदाज स्मृती मानधना म्हणाली की, ‘‘काही कंपन्यांबरोबर प्रायोजकत्वाबाबत प्राथमिक स्तरावर बोलणी सुरू आहेत. अर्थात, आम्हाला बीसीसीआय व रेल्वेकडून भरपूर सहकार्य मिळत आहे.’’

पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड व एकता बिश्त यांना अद्याप एकही प्रायोजक मिळालेला नाही. पूनम म्हणाली, ‘‘आम्ही नुकतेच मायदेशी परतलो आहोत. काही दिवसांनी आमच्या संघातील सर्वाना विविध कंपन्यांकडून प्रायोजकत्वासाठी विचारणा होईल.’’

‘‘पुरुष खेळाडूंकरिता जशी आयपीएल स्पर्धा आयोजित केली जाते, त्याप्रमाणे महिलांकरिता स्पर्धा घेतली गेली तर आपोआपच महिला खेळाडूंच्या आर्थिक समस्या दूर होतील,’’ असे गायकवाडने सांगितले.

झुलन गोस्वामीला बढती

भारताची जलदगती गोलंदाज झुलन गोस्वामीला एअर इंडियाने बढती दिली आहे. एअर इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रमुखांनी मला दिल्लीला बोलावून घेतले आणि त्यांनी   मला उपव्यवस्थापकपदावरून बढती देण्याचा प्रस्ताव दिला, असे झुलनने सांगितले.