भारताची सुवर्णकन्या पी. टी. उषा हिची शिष्या टिंटू लुका व स्थानिक खेळाडू प्रतिक निनावे कोणते पदक जिंकणार, हीच उत्सुकता आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत शनिवारी असेल. लंडन येथील ऑलिम्पिकबाबत लुका हिच्याकडून मोठय़ा अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. मात्र ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत तिला समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. २०१६मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिककरिता ती आतापासूनच तयारी करीत आहे.
पुरुषांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रतिक निनावे हा स्थानिक खेळाडू चांगल्या कामगिरीची आशा बाळगून आहे. त्याने आंतर-राज्य स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सरावाचा ट्रॅक व अनुकूल हवामानासह प्रेक्षकांचा पाठिंबा याचा फायदा तो कसा घेतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तिहेरी उडीत रणजीथ माहेश्वरी हा पदकाचा दावेदार मानला जात आहे. त्याने आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविले आहे.
महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत दुती चांद व आशा रॉय यांच्या कामगिरीवर भारताच्या पदकाच्या आशा अवलंबून आहेत. गोळाफेकीत नवजित कौर हिला पदक मिळविण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागणार आहेत. तिला प्रामुख्याने चीन, कझाकिस्तान, जपान व उझबेकिस्तानच्या खेळाडूंचे आव्हान असणार आहे.
पुरुष व महिला या दोन्ही गटांतील ४ बाय १०० मीटर रिले शर्यतींची अंतिम फेरी तसेच ४ बाय ४०० मीटर रिले शनिवारी होणार आहे. त्याखेरीज महिलांच्या विभागात भालाफेक, हेप्टॅथलॉन, पोल व्हॉल्ट या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धाही होणार आहेत.