News Flash

ऑस्ट्रेलियात पुन्हा विजय हवाच!

‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीच्या कर्णधार विराट कोहलीकडून अपेक्षा

संग्रहित छायाचित्र

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी मालिकेसंदर्भात माझी कर्णधार विराट कोहलीशी चर्चा झाली असून, पुन्हा ऑस्ट्रेलिया भूमीवर भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकावी, अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केली.

सध्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबतची चर्चा क्रिकेटजगतात रंगते आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑक्टोबर महिन्यात तीन सामन्यांची ट्वेन्टी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेनंतर चार कसोटी सामन्यांची मालिका आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका कार्यक्रमपत्रिकेत समाविष्ट आहे. यातील कसोटी मालिकेला ३ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या याआधीच्या दौऱ्यात कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने मालिका २-१ अशी जिंकून इतिहास घडवला होता. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा पहिला आशियाई संघ हा मान भारताने मिळवला होता. परंतु येत्या कसोटी मालिकेत आव्हान वेगळे असेल. माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर संघात परतले आहेत. गेल्या दोन वर्षांत जस्टिन लँगर यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने आपली बलस्थाने आणि कमकुवतपणा यांचा अभ्यास करून पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला क्रिकेटजगतात खंबीरपणे उभे केले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका रंगतदार होईल. परंतु भारतीय संघात मालिका जिंकण्याची क्षमता आहे, असे गांगुलीने सांगितले. ‘‘ऑस्ट्रेलियाशी मालिका आव्हानात्मक ठरेल. २०१८पेक्षा सध्याचा ऑस्ट्रेलियाचा संघ अधिक बलवान आहे. परंतु भारताचा संघही तुल्यबळ आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीची उत्तम फळी आपल्याकडे आहे.’’

‘‘विराट कोहली म्हणून तो अपेक्षा उंचावतो. त्यामुळे तो मैदानावर संघासह मैदानावर जाताना टेलिव्हिजनवर मी पाहतो, तेव्हा फक्त उत्तम खेळावे इतकेच नव्हे, तर ऑस्ट्रेलियात जिंकून यावे, ही माझी अपेक्षा आहे. त्याने संघाला एका विशिष्ट दर्जापर्यंत नेले आहे. त्यामुळे तो कायम राखणे, हे महत्त्वाचे आहे,’’ असे गांगुलीने सांगितले.

‘‘करोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या कालखंडात मी सातत्याने कोहलीच्या संपर्कात आहे. तंदुरुस्तीसंदर्भात त्याला मार्गदर्शन करीत असतो. गोलंदाजांच्या तंदुरस्तीविषयीही चर्चा होते. ऑस्ट्रेलियात पोहोचल्यावर जसप्रीत बुमराख मोहम्मद शमी, इशांत शर्मा, हार्दिक पंडय़ा या वेगवान गोलंदाजांची तंदुरुस्ती उत्तम असायला हवी,’’ असे गांगुली या वेळी म्हणाला.

मालिकेला १० डिसेंबरपासून प्रारंभ?

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी मालिकेला एक आठवडा उशिराने सुरुवात होण्याची शक्यता आहे. ३ डिसेंबरपासून सुरू होणारी ही मालिका १० डिसेंबरपासून सुरू होऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दोन सराव सामने खेळण्याची शक्यता आहे. यासाठी गांगुलीने विलगीकरणाचा १४ दिवसांचा काळ कमी करावा, अशी मागणी केली आहे.मात्र ऑस्ट्रेलियातील आरोग्य खात्याने विलगीकरणाचा कालावधी अनिवार्य असल्याचे म्हटले आहे.

सराव शिबीर लांबणीवर

करोनाच्या साथीमुळे भारताचे चालू वर्षांचे क्रिकेट वेळापत्रक कोलमडले आहे. जुलैच्या मध्यापासून करारबद्ध क्रिकेटपटूंसाठी राष्ट्रीय सराव शिबिराला प्रारंभ होण्याची शक्यता होती. परंतु वाढलेली टाळेबंदी आणि काही भागांमधील प्रवासाचे निर्बंध यामुळे ‘बीसीसीआय’ला शिबीर लांबणीवर टाकावे लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 12:12 am

Web Title: expectations from bcci president sourav gangulys skipper virat kohli abn 97
Next Stories
1 विंडीजच्या विजयापर्यंत खेळपट्टीवर न टिकल्याची ब्लॅकवूडला खंत
2 टाळेबंदीच्या काळात फिंचचे विद्यार्थ्यांला ऑनलाइन मार्गदर्शन
3 आयसीसी क्रमवारीत विंडीज कर्णधाराचा ‘होल्ड’, गोलंदाजांच्या यादीत पटकावलं दुसरं स्थान
Just Now!
X