22 April 2019

News Flash

विश्वचषकात भारतीय नेमबाजांकडून ऑलिम्पिकच्या चार जागांची निश्चिती

राष्ट्रीय रायफल्स महासंघाचे अध्यक्ष रणिंदर सिंग यांना अपेक्षा

(संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रीय रायफल्स महासंघाचे अध्यक्ष रणिंदर सिंग यांना अपेक्षा

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा

आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाज दमदार कामगिरी करण्याची अपेक्षा असून त्यात किमान २ ते ४ नेमबाजांचा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील कोटा निश्चित होईल, अशी अपेक्षा असल्याचे राष्ट्रीय नेमबाजी महासंघाचे अध्यक्ष रणिंदर सिंग यांनी सांगितले.

या विश्वचषक स्पर्धेला भारतात २० फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. नेमबाजीच्या स्पर्धेत तुम्ही प्रत्यक्ष त्या दिवशी कशी कामगिरी करता, त्यावर सर्व निकाल अवलंबून असतो. त्यामुळे भारताला किमान २ ते ४ किंवा त्यापेक्षाही अधिक जागा निश्चित होण्याची शक्यता आहे, असेही रणिंदर सिंग यांनी सांगितले.

भारतात नेमबाजीच्या विश्वचषकाचे हे तिसऱ्यांदा आयोजन होत आहे. मात्र त्या स्पर्धेतून ऑलिम्पिक कोटा निश्चित करण्याची संधी प्रथमच मिळणार आहे. राष्ट्रीय नेमबाजी महासंघाने सरकारची कोणतीही मदत न घेता सर्व जबाबदारी स्वत: पेलली असल्याचे रणिंदर सिंग यांनी नमूद केले. या स्पर्धेत काही पाकिस्तानी नेमबाजदेखील सहभागी होणार असून त्यांना लवरकच व्हिसा मिळेल, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली.

माजी नेमबाज आणि मनू भाकरसारख्या अव्वल पिस्तूल नेमबाजांचा प्रशिक्षक जसपाल राणा यांचे नाव भारतीय संघाच्या प्रशिक्षक यादीतून नजरचुकीने वगळले गेले होते. मात्र ती चूक सुधारत शिबिरात पुन्हा बोलावण्यात आले आहे, असे रणिंदर सिंग यांनी सांगितले.

‘‘मी काही दिवस परदेशात गेलो होतो, त्यामुळे संपर्क होऊ शकला नव्हता. मात्र संघात वरिष्ठ किंवा कनिष्ठ प्रशिक्षक असा कोणताही वाद नसून जर नेमबाजांना काही विशिष्ट प्रशिक्षकांसहच सहभागी व्हायचे असेल, तर त्यांना तशी परवानगी दिली जाते. भारताने यापूर्वीच महिलांच्या १० मीटर रायफल स्पर्धेतील दोघांचा ऑलिम्पिक कोटा पटकावला आहे,’’ असे रणिंदर सिंग म्हणाले. गतवर्षी चॅँगवॉनमधील स्पर्धेतच अंजुम मुदगील आणि अपूर्वी चंडेला यांनी स्थान  निश्चित केले आहे. त्यामुळे १६ पैकी १४ जागांसाठी आता भारतीय नेमबाजांना ७ स्पर्धामध्ये सर्वोत्तम कामगिरी करून दाखवावी लागणार आहे.

First Published on February 10, 2019 1:35 am

Web Title: expectations from indian shooters for the national rifles federation