भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीला आपला पाठींबा दर्शवला आहे. यष्टींमागे सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या धोनीला फलंदाजीत हवीतशी कामगिरी करताय येत नाहीये. एखाद्या सामन्याचा अपवाद वगळता धोनी फलंदाजीत फटकेबाजी करण्यास अपयशी ठरतोय. मात्र धोनीचा अनुभव हा संघासाठी खूप महत्वाचा आहे. अनुभव हा बाजारात विकत मिळत नाही, असं म्हणत शास्त्रींनी धोनीला आपला पाठींबा दर्शवला. इंडिया टुडे या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री बोलत होते.

अवश्य वाचा – …म्हणून धोनीच्या हेल्मेटवर तिरंगा नसतो

२०१७ सालापासून धोनी आपल्या संथगती फलंदाजीमुळे टीकाकारांचं सतत लक्ष्य बनत आलेला आहे. व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, अजित आगरकर यांसारख्या माजी खेळाडूंनीही धोनीला क्रिकेटमधून संन्यास घेत नवोदीतांना संधी देण्याचा सल्ला दिला होता. मात्र संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनी संघात असणं गरजेचं असल्याचं म्हणत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. ३६ व्या वर्षात धोनीने स्वतःला ज्या पद्धतीने तंदुरुस्त ठेवलं आहे, ते पाहता त्याची जागा संघात कोणीही घेऊ शकत नाही असंही शास्त्री यांनी नमूद केलं.

अवश्य वाचा – २००३ च्या विश्वचषकावेळी धोनी माझ्या संघात हवा होता – सौरव गांगुली

आफ्रिका दौरा आटोपल्यानंतर सध्या भारतीय संघ श्रीलंकेत तिरंगी टी-२० मालिका खेळणार आहे. बांगलादेश-श्रीलंका-भारत यांच्यात रंगणाऱ्या मालिकेत बीसीसीआयच्या निवड समितीने विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीसह सर्व प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे या दौऱ्यात दिल्लीचा यष्टीरक्षक आणि स्फोटक फलंदाज ऋषभ पंतला संघात जागा मिळण्याची शक्यता आहे. तिरंगी मालिकेनंतर सर्व भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे धोनी या स्पर्धेत कशी कामगिरी करतो याकडे सर्व क्रीडारसिकांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – धोनी व ब्राव्हो यांच्याकडून बुद्धिमत्ता मिळण्यासाठी उत्सुक