मुंबई : गतवर्षी दोन सुवर्णपदके कमी मिळाल्यामुळे अव्वल स्थान हुकले होते. मात्र यंदा यजमानपद भूषवताना अग्रेसर ठरण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या खेळाडूंना नामांकित मार्गदर्शकाकडून १५ दिवसांचे विशेष प्रशिक्षण देत असल्याची माहिती शालेय शिक्षण आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी बॉम्बे जिमखाना येथे झालेल्या ‘खेलो इंडिया’ क्रीडा स्पर्धेच्या पत्रकार परिषदेत दिली.

पुण्याच्या म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ९ ते २० जानेवारी या कालावधीत १८ क्रीडा प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. यात महाराष्ट्राचे ९५४ खेळाडू सहभागी होणार आहेत. ‘खेलो इंडिया’साठी केंद्राचा निधी मिळाला. यापैकी ८० टक्के निधी सोयीसुविधांवर खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे बालेवाडीमधील नेमबाजी केंद्र ऑलिम्पिक दर्जाचे झाले आहे, अशी माहिती तावडे यांनी दिली. या वेळी आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत, धावपटू रचिता मिस्त्री आणि क्रीडा उपसचिव राजेंद्र पवार उपस्थित होते.

‘गॅझेटविरहित’ संध्याकाळसाठी आवाहन

‘व्हिडीओ गेम छोडो, मैदान से नाता जोडो’ असे आपण म्हणताना विद्यार्थ्यांना गॅझेटपासून दूर करणे आवश्यक आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे कमी आणि मैदानात जास्त वेळ घालवणे आवश्यक आहे. क्रीडा क्षेत्रात उत्तम कारकीर्द घडू शकते, हे लक्षात घेऊन त्याला महत्त्व देणे आवश्यक आहे. त्यामुळे शाळांनी आणि पालकांनीसुद्धा आपल्या मुलांनी आठवडय़ातील एक संध्याकाळ ‘गॅझेटविरहित’ साजरी करावी, असे आवाहन तावडे यांनी केले.