भारताच्या १९ वर्षाखालील संघाने ऑस्ट्रेलियन संघांचा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धुव्वा उडवत जेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियन संघाने दिलेले २१७ धावांचे आव्हान टीम इंडियाने आठ गडी राखून दहाहून अधिक षटके शिल्लक असतानाच पूर्ण केले. हा भारताचा १९ वर्षाखालील क्रिकेटमधील चौथा विश्वचषक आहे. याआधी २००० साली मोहम्मद कैफ, २००८ साली विराट कोहली आणि २०१२ रोजी उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारताने अशीच कामगिरी केली होती.

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय ऑस्ट्रेलियन संघाने घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी केवळ ऑस्ट्रेलियन संघाच्या धावगतीलाच लगाम न घालता वेळोवेळी विकेट्स घेतल्याने ऑस्ट्रेलियन संघ संपूर्ण ५० षटकेही न खेळता २१६ धावांवर तंबूत परतला. इशार पोरेल, शिवा सिंग, कमलेश नागरकोटी आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी दोन तर शिवम मावीने एक विकेट घेतली. तुलनात्मक रित्या सोप्प्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या मनजोत कालराने अवघ्या १०२ चेंडूत १०१ धावांची नाबाद खेळी केली. त्याला हार्वीक देसाई (नाबाद ४७), कर्णधार पृथ्वी शॉ (२९) आणि शुभम गील (३१) यांची चांगली सोबत केली. या विजयानंतर भारतीय संघाने मैदानात केलेल्या खास सेलिब्रेशनची सध्या सोशल नेटवर्किंगव चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र या सेलिब्रेशनचा अर्थ अनेकांना ठाऊक नाहीय म्हणूनच आम्ही सांगत आहोत नक्की काय होते ते सेलिब्रेशन.

हार्वीक देसाईने ऑफ साईडला चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि भारतीय खेळाडूंचा एकच जल्लोष सुरु झाला. डगाआऊटमध्ये बसलेले पृथ्वी शॉ,शुभम गील बरोबरच इतर खेळाडूही लगेचच धावत मैदानावर आले आणि त्यांनी शतकवीर मनजोतला मिठ्या मारल्या. त्यानंतर पृथ्वी शॉने एक वेगळ्या प्रकारचे सेलिब्रेशन मैदानातच क्रिजजवळ केले. पृथ्वी शॉ आपल्या हाताने एखादी शक्तीशाली ऊर्जा सोडतो आणि समोरचे सर्व खेळाडू पडतात अशाप्रकारचं हे सेलिब्रेशन होतं. खरं म्हणजे क्रिकेटच्या मैदानात असं वेगळे सेलिब्रेशन नवीन असलं तरी हे फुटबॉलच्या फिफा १८ या गेममध्ये तरी वरचेवर पहायला मिळेत.

काय आहे हे सेलिब्रेशन

या सेलिब्रेशनला हायपनोसीस सेलिब्रेशन असं म्हणतात. सर्व खेळाडूंना समोर गोळा करुन हाताने सोडलेल्या टेलीकायनॅटिक पॉवरच्या (हवेच्या माध्यमातून जाणारी अदृश्य शक्ती) माध्यमातून जमीनीवर पाडायचे असे हे सेलिब्रेशन असते. या संदर्भात स्पोर्टसकीड या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार हे अशाप्रकारचे हायपनोसीस सेलिब्रेशन फिफा १८ या गेममध्ये अनेकदा केले जाते. जेव्हा एखादा संघ एखाद्या सामन्यात किंवा स्पर्धेमध्ये इतरांपेक्षा खूपच वरचढ कामगिरी करतो त्यावेळी हे सेलिब्रेशन केले जाते.

पाहा भारतीय संघाचे हे सेलिब्रेशन