बंगाल क्रिकेट असोसिएशनने (कॅब) आपल्या खेळाडूंसाठी नेत्र परीक्षण म्हणजेच डोळ्यांची चाचणी अनिवार्य केली आहे. “बंगालच्या सर्व क्रिकेटपटूंसाठी डोळ्यांची चाचणी अनिवार्य असेल”, अशी माहिती कॅबने एका पत्रकाद्वारे दिली. सोमवारी बंगाल क्रिकेट संघाचा प्रशिक्षक कर्मचारी वर्ग आणि कॅबचे पदाधिकारी यांच्यात एक बैठक झाली. त्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. बंगालचे मुख्य प्रशिक्षक अरुण लाल यांनी खेळाडूंसाठी डोळ्याच्या चाचणीचा प्रस्ताव बैठकीत सर्वांसमोर ठेवला होता. तो प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

क्रिकेटमध्ये चेंडू नवा असताना तो अधिक स्विंग होतो आणि वेगाने फलंदाजाच्या अंगावर येतो. अशा वेळी डोळ्यांची चाचणी झाली असेल, तर नव्या चेंडूवर फलंदाजांना खेळताना त्याचा फायदाच होईल, असे मत लाल यांनी या प्रस्ताव मांडले होते. या प्रकरणात अधिक लक्ष घालण्यासाठी कॅब आता नेत्र तज्ञ आणि राज्य संघटनेच्या वैद्यकीय समिती सदस्य नंदिनी रॉय यांचा सल्ला घेणार आहे. हंगामाची सुरूवात होण्याआधी लावण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये डोळ्यांची चाचणी घेतली जाईल.

“नजर हा एक महत्वाचा पैलू आहे. फलंदाजी करताना रिफ्लेक्सचा संबंध येतो. त्यावेळी नजर खूप मोठी भूमिका बजावते. त्यामुळे आम्हाला खेळाडूंच्या डोळ्यांबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही”, असे कॅबचे अध्यक्ष अविशेक दालमिया यांनी सांगितले. दरम्यान, कॅबने प्रशिक्षण पुन्हा केव्हा सुरू करण्यात येईल याबाबत माहिती दिलेली नाही.