भारताविरुद्ध दारुण पराभव पत्करल्यानंतर उर्वरित स्पर्धेत चमकदार कामगिरी केली नाही तर मायदेशी परतल्यानंतर चाहत्यांच्या रोषाला सामोरे जाण्यासाठी आतापासूनच सज्ज व्हा, अशा शब्दांत पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने सहकाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला सातव्यांदा भारताविरुद्ध पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यामुळे सध्या पाच सामन्यांतून फक्त एक विजय आणि तीन पराभवांसह पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी फेकला गेला आहे.

‘‘भारताविरुद्धच्या पराभवामुळे आमचे आव्हान संपुष्टात आले आहे, असे कोणीही समजू नका. मात्र उर्वरित स्पर्धेत आम्ही कामगिरी सुधारली नाही, तर फक्त मलाच नव्हे तर संघातील सर्व खेळाडूंना मायदेशी परतल्यावर चाहत्यांपासून स्वत:चा बचाव करणे कठीण जाईल,’’ असे सर्फराज म्हणाला. त्यामुळे खेळाडूंनी आताच जागे होऊन सर्वाना चोख प्रत्युत्तर द्यावे, असेही त्याने खडसावले.